पाटोदा : गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा व मागील वर्षापासून कोरोना महामारीच्या संकटामुळे द्राक्ष पिकास अपेक्षित भाव मिळत नसल्याने द्राक्ष शेती तोट्याची होऊ लागली आहे. या त्रासामुळेच काही ोशेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालविली आहे. यावर्षी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांत पडलेल्या अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांना फटका बसला असून, द्राक्ष मण्यांना तडे गेल्याने व्यापाऱ्यांनी या भागातील द्राक्ष खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी कोलमडून पडला असल्याने येवला तालुक्यातील ठाणगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी दीपक साहेबराव कव्हात या युवा शेतकऱ्याने हतबल होऊन आपल्या गट नंबर २६० मध्ये पिकासह उभ्या असलेल्या द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवून द्राक्ष बाग आडवी करत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. मागील वर्षी अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलावर मात करीत द्राक्ष बागेसाठी एकरी तीन लाख रुपये खर्च करून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेतले. मात्र, कोरोनाच्या महामारीमुळे मातीमोल भावात द्राक्षे विकावी लागली. त्यामुळे औषधी तसेच मजुरांची देणेदारीचे सुमारे चार लाख रुपये रक्कम घरातून द्यावी लागली. यावर्षीही नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या महिन्यांत वातावरणातील बदल, तसेच पडलेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे. द्राक्ष मण्यांना तडे गेल्याने व्यापाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागा खरेदीकडे पाठ फिरवली असून, त्यांनी आपला मोर्चा सांगली जिल्ह्याकडे वळविला असल्याने या भागातील शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या विनवण्या करून द्राक्ष कवडीमोल भावात विकावी लागत असल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.कवडीमोल दरनोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत वातावरणातील बदल व अवकाळी पावसामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. मात्र, कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गाचे आर्थिक गणित कोलमडून पडले असल्याने द्राक्ष बागा उभ्या करण्यासाठी बँका, पतसंस्था व सहकारी सोसायट्यांमार्फत घेतलेले कर्ज तसेच औषध विक्रेत्यांचे देणे कसे फेडायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. जे प्लॉट ऑक्टोबर छाटणीचे आहेत, ते आज सहा महिन्यांचे झाले आहेत. मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने बागांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष मण्यांना तडे गेल्याने पंधरा ते सोळा रुपये दरानेही खरेदीदार मिळत नसल्याने पीक बागेवर तसेच शिल्लक आहे. गेल्या पंधरा- वीस दिवसांपासून उष्णता जास्त वाढल्याने पिकावर उकाड्याचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने पीक धोक्यात आले आहे.माझ्याकडे सात एकर द्राक्ष बाग आहे. गेल्या दोन- तीन वर्षांपासून वातावरणातील बदलामुळे द्राक्ष बागा धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. मागील वर्षापासून कोरोनाच्या नव्या संकटामुळे द्राक्षे मातीमोल भावात विकावी लागली. खर्च जास्त आणि उत्पन्न कामी, अशी स्थिती निर्माण झाल्याने आर्थिक गणित जुळवणे अवघड झाले असल्याने जड अंत:करणाने द्राक्ष बाग तोडण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे.-दीपक कव्हात, शेतकरी, ठाणगाव.
ठाणगावच्या शेतकऱ्याची द्राक्ष बागेवर कुऱ्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 6:00 PM
पाटोदा : गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा व मागील वर्षापासून कोरोना महामारीच्या संकटामुळे द्राक्ष पिकास अपेक्षित भाव मिळत नसल्याने द्राक्ष शेती तोट्याची होऊ लागली आहे. या त्रासामुळेच काही ोशेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालविली आहे.
ठळक मुद्देउष्णतेमुळे प्रादुर्भाव : निसर्गाचा लहरीपणा अन् कोरोना फटका