नाशिक : कुठल्याही आजारांमध्ये आयुर्वेद ही प्रथम उपचार पद्धती असणे आवश्यक आहे. केरळने यानुसार अंमलबजावणी सुरू केली असून, अन्य राज्यांमध्येही आयुर्वेदाला प्राधान्य देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन गुजरात आयुर्वेद विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. श्रीराम सावरीकर यांनी केले.ओजस वैद्य समूह, विश्वगंध आयुर्वेद चिकित्सालय संशोधन केंद्र आणि वैद्यरत्नम औषधशाळा केरळ यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय ‘मर्म’ राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकामध्ये झालेल्या परिसंवादाच्या उद्घाटनाप्रसंगी सावरीकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी के. के. वासुदेवान, वैद्य समीर जमदग्नी, वैद्य श्रीलाल अे. एम. वैद्य, डॉ. अभय कुलकर्णी, वैद्य डॉ. सुदेश कु मार, तुषार सूर्यवंशी आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी सावरीकर म्हणाले, सरकारी पातळीवर आयुर्वेदाला विशेष महत्त्व प्राप्त होण्याची गरज आहे. सरकारने विविध राज्यांमध्ये शुद्ध आयुर्वेदाचे ज्ञान देणारी महाविद्यालये खुली क रण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जोपर्यंत जनसामान्यांमध्ये आयुर्वेदाचे ज्ञान पोहचणार नाही तोपर्यंत आयुर्वेद उपचारपद्धतीबाबत जागरूकता आणि शाश्वती नागरिकांमध्ये येणार नाही. आयुर्वेदिक रुग्णालयांची संख्या वाढविणे ही काळाची गरज आहे. केरळ राज्याच्या धर्तीवर अन्य राज्यांमध्येही आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार व प्रभावी उपचारपद्धतीचा अवलंब होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. आयुर्वेदात १०७ मर्मस्थाने सांगितलेली असून, रोगावर उपचार करताना या मर्मस्थानांचा विचार महत्त्वाचा ठरतो हे लक्षात घेणे गरजेचे असल्याते सावरीकर यांनी यावेळी सांगितले.दुपारच्या अखेरच्या तिसऱ्या सत्रात पुण्याचे वैद्य डॉ. समीर जमदग्नी यांनी उपस्थित सुमारे तीनशे वैद्यांना तीन मर्माविषयीची सखोल माहिती सांगितली. यावेळी त्यांनी हृदय, मेंदू, किडनी विकारांमध्ये पाळावयाची पथ्ये, उपयुक्त औषधांचे वर्णन केले. (प्रतिनिधी)
आयुर्वेदाला प्राधान्याची गरज
By admin | Published: August 21, 2016 11:21 PM