नाशिक : 'आझादी का अमृतमहोत्सव' या संकल्पनेंतर्गत स्वातंत्र्यसैनिक, अखिल भारतीय हिंदू महासभेचे तत्कालीन अध्यक्ष धर्मवीर डॉ. बालकृष्ण शिवराम मुंजे यांच्या १४९व्या जयंतीनिमित्त देशाच्या राजधानीत दिल्लीत त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. डॉ. मुंजेच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंचे यावेळी गौरवपूर्ण स्मरण करण्यात आले.
डॉ. मुंजे यांच्या १४९व्या जयंती वर्षाची सुरुवात नवी दिल्ली येथील पहाडगंज येथील रेल्वे स्थानकासमोरील भव्य पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मूळ नाशिककर असलेल्या दिल्लीस्थित निवेदिता मदाने-वैशंपायन यांनी डॉ. मुंजे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. दुर्बलांना साथ आणि दुष्टांना शिक्षा, स्वयंशिस्त, संस्कार याविषयावर विचारांचे आज ही महत्त्व अबाधित आहे, असे श्रीमती निवेदिता यांनी यावेळी सांगितले.
विशेषत: हिंदू राष्ट्राचे स्वप्न आणि त्यासाठी केलेले प्रयत्न, लष्कराचे सहकार्य याबाबत त्यांना सुमनांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहाडगंज शहर पदाधिकारी हरीश रोहतास, भारतीय जनता पक्षाचे मंडळ अध्यक्ष मनीष चढ्ढा, हरीश भरिजा, बबिता भरिजा, राजपाल राजपूत रोहित, कबीर वैशंपायन आदी उपस्थित होते. हिंदू जागरण मंच झंडेवाला विभागाचे समन्वयक डॉ.अरुण कुमार यांनी सूत्रसंचालन केले.