लासलगाव : येथील बाबा अमरनाथ सोशल ग्रुपच्या गोसेवा, भंडारा, रक्तदान व इतर समाजोपयोगी उपक्रमाचे इतरांनी अनुकरण करावे, असे प्रतिपादन प.पू. मधुस्मिताजी म.सा. यांनी केले.येथील बाबा अमरनाथ सोशल ग्रुपच्या वतीने गुरुवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे ३५२ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. येथील शिवकमल मंगल कार्यालयात पूज्य मधुस्मिताजी म.सा., पूज्यश्री भाविप्रतीजी म.सा., पूज्यश्री विधीजी म.सा. यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर झाले. प.पू. मधुस्मिताजी म.सा यांनी गोसेवेसंदर्भात मार्गदर्शन केले. संजीवनी रक्तपेढी नाशिक यांचे वतीने झालेल्या रक्तदान शिबिरात परिसरातील युवकांनी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. सुमारे दहा महिलांनी या शिबिरात रक्तदान केले. मागील वर्षी ३५७ रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. बाबा अमरनाथ सोशल ग्रुपचे हे तिसरे वर्ष होते. आत्तापर्यंत अकराशे रक्तपिशव्या संकलन करण्यात आल्या आहेत. या शिबिराला जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहनलाल चोपडा, पंचायत समितीचे सदस्य प्रकाश पाटील, शिवा सुराशे, संजय पाटील, डॉ. श्रीनिवास दायमा, डॉ.अनिल बोराडे, डॉ. विलास कांगणे, डॉ. सूर्यवंशी, डॉ.किरण निकम, महावीर नाहाटा, प्रवीण ताथेड, सौ. ज्योती ताथेड, विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी भेट दिली. बाबा अमरनाथ सोशल ग्रुपचे पदाधिकारी, संजीवनी रक्तपेढी नाशिकचे राहुल जगदाळे, सपना नवले, नीलिमा इसाइ, मनोज शेख यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
बाबा अमरनाथ सोशल ग्रुपचे कार्य स्तुत्य
By admin | Published: September 09, 2016 10:48 PM