नाशिक : अयोध्येमधील बाबरी मशिदीचा २५वा स्मृतिदिन बुधवारी (दि.६) जुने नाशिकमधील विविध मुस्लीम धार्मिक संघटनांच्या वतीने पाळण्यात आला. यावेळी शहरामधील शहजहांनी मशिदीत सामुहिकरित्या दुपारी धार्मिक संघटनांच्या पदाधिका-यांनी एकत्र येऊन अजान पठण केली.जुने नाशिकसह वडाळागाव परिसरातील विविध मशिदींमधून ‘बाबरी’च्या स्मृतिप्रित्यर्थ दुपारी अजान पुकारण्यात आली. स्मृतिदिनाचा सामुहिक कार्यक्रम शालिमार येथील शहाजहॉँनी मशिदीत पार पडला. बाबरी मशिद पतन प्रकरण न्यायप्रविष्ट असताना भाजपाकडून गुजरात निवडूक डोळ्यापुढे ठेवून वारंवार येत्या १८ डिसेंबर रोजी मंदिर उभारणीला प्रारंभ करण्याची घोषणा करत राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नुरी अकादमीचे शहराध्यक्ष हाजी वसीम पिरजादा यांनी केला.
‘मंदिर कार्ड’ वापरून भाजपा गुजरातमध्ये अस्तीत्व सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न जरी करत असले तरी हा प्रयत्न देशाच्या एकात्मतेला मारक ठरणारा आहे, असे मत यावेळी त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडून याबाबत निकाल दिला जात नाही तोपर्यंत सत्ताधारी पक्षाच्या सरकारने गुजरात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर याविषयी वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतालासमोर ठेवून भाजपाच्या अशा वक्तव्यांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, कारण ते देशाचे पंतप्रधान आहे, असेही ते म्हणाले. यावेळी मशिदीमध्ये बाबरी मशिदीचे छायाचित्र प्रदर्शित करण्यात आले होते. सामुहिकरित्या अजान पठणानंतर देशामध्ये कायदा-सुव्यवस्था टिकावी, एकात्मता जोपासली जावी, यासाठी सामुहिकरित्या प्रार्थना करण्यात आली. दरम्यान, जिल्हाधिका-यांना मुस्लीम धार्मिक संघटनांच्या वतीने यासंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी हाजी वसीम पिरजादा, रझा अकादमीचे एजाज रझा मकरानी, असलम खान यांच्यासह मुस्लीम बांधव उपस्थित होते.