नाशिक : घरात खेळत असताना अवघ्या ११ महिन्यांचा चिमुकला पाण्याच्या बादलीमध्ये तोल जाऊन उलटा पडल्याने नाका-तोंडात पाणी जाऊन मृत्युमुखी झाल्याची दुर्दैवी घटना मोरे मळा, हनुमानवाडी परिसरात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण मोरे मळा भागात हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, अकरा महिन्यांचा तन्मय घरात खेळत होता. खेळताना तो पाण्याने भरलेल्या एका बादलीमध्ये डोक्याच्या बाजूने रविवारी (दि.४) दुपारी १२ वाजेच्या सुमारास पडला. तन्मयचे डोके बादलीत बुडाल्याने त्याचा श्वास रोखला गेला. दरम्यान, ही बाब काही वेळेनंतर पालकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ तन्मयला बादलीतून बाहेर काढत रुग्णालयात धाव घेतली; मात्र तत्पूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासून तन्मय दीपक भोये या बाळाला मयत घोषित केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.काही महिन्यांपूर्वीच एका चिमुुकलीचा फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये खेळताना तोल जाऊन खाली कोसळल्याने मृत्यू झाल्याची घटना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. अशा दुर्दैवी घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पाण्याच्या बादलीत पडून बाळाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 1:02 AM