नाशिकरोड : मावशीच्या घरी आलेल्या जेमतेम वर्षभराचा तान्हुला मुलगा रांगत रांगत रविवारी (दि.१) रात्री घराच्या बाथरूममध्ये गेला असता तेथे पाण्याने भरलेल्या एका लहानशा प्लॅस्टिकच्या टबमध्ये पडला. नाका-तोंडावाटे पाणी गेल्याने बाळाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याचे उघडकीस आले. या घटनेने डीजीपीनगर-१, साईसंतोषीनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बहिणीची प्रसूती झाल्याने द्वारका जवळील तिगरानिया रस्त्यावर राहणारे मोहेद शेख यांच्या पत्नी या त्यांच्या एक वर्षाच्या एकुलता एक चिमुकला आबिदसोबत साई संतोषीनगर येथे गेल्या महिन्यात आल्या होत्या. येथील साईकुटीर सोसायटीत राहणाऱ्या त्यांच्या बहिणीच्या घरात रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली. आबीद आपल्या आईच्या हाताने गाजरचा हलवा खात असताना अचानकपणे रांगत रांगत बाथरूममध्ये गेला.तेथे आबिद पाण्याच्या टबमध्ये कलंडून पडल्याचे त्याची आई व इतर नातेवाइकांच्या लक्षात आले. दरम्यान, त्यांनी तत्काळ आबिदला खासगी रुग्णालयात उपचाराकरिता हलविले, मात्र त्या ठिकाणी यंत्रणा नसल्याने तेथून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून आबिदचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.काही महिन्यांपूर्वी अशीच घटना पंचवटीच्या रामवाडी भागात घडली होती. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास उपनगर पोलिस करीत आहे.कोसळला दु:खाचा डोंगरआबिद हा माहेद शेख यांचा एकुलता एक मुलगा होता. गोंडस, गुटगुटीत आबिद हा घरात सगळ्यांचाच लाडका होता. त्याच्या अशा अचानकपणे झालेल्या मृत्यूने शेख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.सप्टेंबर महिन्यातदेखील अशीच एक दुर्दैवी घटना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच घडली होती. विहितगाव एका बंगल्यात खेळत असताना बंगल्याच्या आवारात असलेल्या भूमिगत जलकुंभाच्या उघड्या झाकणामधून तोल जाऊन तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.
पाण्याच्या टबमध्ये बुडून बाळाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 1:53 AM