कळवण : दि कळवण मर्चंट को-आॅप. बॅँकेत केलेले सभासद, नूतनीकरण व पोटनिवडणूक यासह विविध मागण्यांबाबत चौकशी करण्याचे सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक गौतम बेलसाणे यांच्या आश्वासनानंतर व सहकार विभागाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर कमकोचे माजी संचालक कैलास जाधव यांनी कमको बॅँकेसमोरील उपोषण मागे घेतले. दरम्यान, १५ दिवसांत चौकशी होऊन न्याय न मिळाल्यास पुनश्च उपोषणाचा इशारा जाधव यांनी उपोषण सांगताप्रसंगी सहकार विभागाला दिला. कमकोतील सत्ताधाऱ्यांसह विरोधी गटाच्या कमकोच्या विद्यमान व माजी पदाधिकारी, संचालक व सर्वपक्षीय पदाधिकारी व सभासदांनी उपोषणकर्ते जाधव यांची दिवसभरात भेट घेतली व चर्चेतून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला. कमको बॅँक पदाधिकारी व संचालकांनी उपोषणकर्ते जाधव यांची उपोषणस्थळी भेट घेऊन मागण्यांबाबत लेखी आश्वासन देऊन चर्चेची तयारी दर्शविली. जाधव यांच्या मागण्यांबाबत बॅँकेने सकारात्मक प्रतिसाद देऊन शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न केला; परंतु सहकार विभागाच्या लेखी आश्वासनावर जाधव ठाम राहिल्याने सहायक निबंधक प्रकाश देवरे यांच्या लेखी आश्वासनानंतर जिल्हा उपनिबंधक यांचे प्रतिनिधी एस. ए. देवघरे व नायब तहसीलदार आर. एम. गांगुर्डे यांनी लिंबू सरबत देऊन उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक मांडवळकर, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, कमकोचे माजी अध्यक्ष सुनील शिरोडे, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रकाश आहेर व जितेंद्र वाघ, कमकोचे अध्यक्ष प्रवीण संचेती, भाजपा शहराध्यक्ष निंबा पगार, दिलीप पगार, डॉ. अनिल महाजन, अनिल मालपुरे, बंडू पगार, नरेंद्र वालखडे, दीपक अमृतकार, धीरज कोठावदे यांच्यासह कैलास जाधव समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हा उपनिबंधक करणार चौकशीदि कळवण मर्चंट को-आॅप. बॅँकेच्या संचालक मंडळाने सन २०१५-२०१६ मध्ये कार्यक्षेत्राबाहेरील सभासद करून कर्जपुरवठा केला असल्याने त्यांचे सभासदत्व रद्द करावे, कमकोच्या पाच संचालकांनी सन २०१७ मध्ये राजीनामा दिल्याने पोटनिवडणूक घ्यावी व त्यानंतर बॅँकेचा नूतनीकरण सोहळा घ्यावा, संचालक मंडळाच्या नातेवाइकांना कर्जवाटप करण्यात आले आहे, त्यांची लेखापरीक्षणाची नियुक्ती करून चौकशी करावी. कमको बॅँकेच्या नूतनीकरण कामाची चौकशी करावी आदी पाच मागण्यांच्या चौकशीबाबत जिल्हा उपनिबंधक गौतम बेलसाणे यांनी १५ दिवसांत चौकशी करण्याचे आदेश दिले असून चौकशी अधिकारी यांची नेमणूक केली आहे.
आश्वासनानंतर उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 1:19 AM