चांदोरी : वाढत्या महागाईच्या काळात आडसाली उसातून उत्पादन घटू लागल्याने आडसाली ऊसशेतीचे क्षेत्र कमी होत आहे. एकीकडे साखर कारखाने आडसाली उसाची उचल नियोजित गळीत हंगामात करीत नाहीत, तर दुसरीकडे ऊसतोडणी मजुरांकडून लूट होत असते, तसेच उसाची उचल १८ ते १९ महिन्यांनी होत असते. परिणामी, आडसाली ऊस उत्पादनात घट होते.
नाशिक जिल्ह्यात द्वितीय पीक घेण्याच्या पद्धतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला. यंदापासूनच आडसाली ऊस क्षेत्राकडे बहुतांश अल्पभूधारक शेतकऱ्यांनी पाठ फिरविली.
त्याऐवजी सोयाबीन, भात, टोमॅटो मका या पिकांना पसंती देत आहे.
ऊस शेतीच्या वाढत्या खर्चाचा आलेख बघता, पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने, ट्रॅक्टर मशागत खर्च मोठ्या प्रमाणात वाढला, रासायनिक खतांच्या किमती वाढल्या, नियोजित हंगामानुसार खतांच्या टंचाईचा फटका शेतीला बसतो.
शेतमजुरांच्या मजुरीची झालेली दरवाढ, मशागतीचा खर्च वाढल्याने आडसाली ऊस उत्पादक शेतकरी दिवसेंदिवस अडचणीत येत आहे.
कारखान्यांकडून ऊसतोडणीचे नियोजनात्मक कामकाज होत नाही. आडसाली उसाचे पीक १८ ते १९ महिने उभे ऊस पीक शेतात असते. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होतो. १९ महिन्यांच्या ऊस पिकातून वजनात घट होते. उत्पादन खर्च अधिक नफा यांचा मेळ बसत नाही. आडसाली ऊस पीक हे गरीब व मध्यम शेतकऱ्यांना या काळात परवडत नाही.
-----------------
खरीप पिकांच्या उत्पादनाकडे कल
कोरोनाच्या महामारीच्या काळात होणारी अन्नधान्य टंचाई, तसेच खाद्यतेलाचे भडकलेले दर वाढती महागाई यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. खरीप पिकांच्या उत्पादनात धान्य मिळते. आडसाली उसाची वेळेवर तोड होत नाही. साखर कारखान्यांकडून आडसाली ऊस क्षेत्राची वेळेत उचल होत नाही. १८ ते १९ महिने ऊस उभे पीक असल्यामुळे वजनात घट होते. एकरी १५ ते १७ हजार रुपयांचा तोटा होतो.
- नीलेश शिंदे, शेतकरी चांदोरी