नाशिकरोड : रेल्वे बोर्डाने मालधक्क्याच्या भाडेवाढीमध्ये सहा पटीने वाढ केल्याने ट्रान्सपोर्ट चालकांनी माल मागविणे बंद केले आहे. भाडेवाढीमुळे कंपन्यांनीदेखील रेल्वे रॅकमार्फत माल पाठविणे बंद केल्याने मालधक्क्यावर अद्याप मालाचा एकही रॅक येऊ शकला नाही.रेल्वे बोर्डाने गेल्या १ जूनपासून मालधक्क्याच्या भाड्यामध्ये सहा पटीने वाढ केली आहे. तसेच रॅकमधून माल उतरविल्यानंतर तो उचलण्यासाठी १२ तासांचा असलेला कालावधी आठ तासांवर आणला आहे. बोर्डाच्या या निर्णयाविरोधात महाराष्ट्र स्टेट रेल्वे गुड शेड हुंडेकरी असोसिएशनने कंपन्यांकडून माल न मागविण्याचा संप पुकारला होता. कंपन्यांनादेखील रेल्वे बोर्डाचा भाडेवाढीचा निर्णय मान्य नसल्याने त्यांनीदेखील रेल्वे रॅकद्वारा माल पाठविणे बंद केले आहे. ट्रान्सपोर्ट चालकांच्या संपामुळे मालधक्क्यावरील काम पूर्णपणे थंडावले असून, यामुळे माथाडी व अनोंदणीकृत कामगार यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वेमंत्र्यांची भेटहुंडेकरी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वीच दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार व कोल्हापूरचे खासदार संजय महाडिक यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. पवार व महाडिक यांच्यासोबत हुंडेकरी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी गौडा यांनी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. मात्र हुंडेकरी असोसिएशनने रेल्वे रॅकमार्फत माल न मागविण्याचा केलेला संप मागे घ्यावा, असे आवाहन केले. त्यानुसार हुंडेकरी असोसिएशनने दोन दिवसांपूर्वी संप मागे घेण्याची घोषणा केली; मात्र माल पाठविताना संबंधित कंपनी मालधक्का भाडे व विलंब शुल्क भरण्यास तयार असेल तर माल पाठवावा, असे असोसिएशनकडून कंपनीला कळविण्यात आले. (प्रतिनिधी)