नाशिक : कडाक्याच्या थंडीनंतर यंदा फेब्रुवारीच्या मध्यावरच उन्हाळ्याची चाहूल लागल्यानंतर दिवसेंदिवस अंशाअंशाने तपमानात वाढ झाली असून, एप्रिलच्या मध्यात तपमानमानाचा पारा ३७ अंशांवर गेल्याने नाशिककरांची काहिली होऊ लागली आहे. तपमान वाढू लागल्याने नागरिकांकडून कुलरची खरेदी होत असून, नामांकित कंपनीचे कुलरसोबतच स्थानिक उत्पादकांच्या डेझर्ट कुलरची मागणी वाढली आहे. डेझर्ट कुलर म्हणजे तिन्ही बाजूंनी फक्त लोखंडी आणि गवताच्या जाळीने आच्छादलेला कुलर असून, गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्याच्या तोंडावर अशा डेझर्ट कुलरची मोठ्या प्रमाणात मागणी वाढू लागल्याने शहरातील विविध भागात या कुलरचे उत्पादन होत आहे. तिन्ही बाजूंनी हवा आपल्याकडे ओढून समोरच्या बाजूने गारेगार हवा फेकण्याचे काम हा कुलर करतो. नामांकित कुलरमध्ये तिन्ही बाजू बंद असतात. त्यामुळे कडक उन्हाळ्याची तीव्रता कमी करण्यासाठी डेझर्ट कुलरला प्राधान्य दिले जाते. हे कुलर्स नामांकित कंपन्यांच्या तुलनेत केवळ पंधराशे रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत परवडणाऱ्या किमतीत मिळतात. कुलरच्या आकारानुसार त्यात वाढ होते. यात दोन फुटांपासून ते चार फूट आकाराचे कुलर्स असतात. साधारणत: हे कुलर शंभर फुटांपासून सहाशे चौरस फूट हॉल अथवा खोलीसाठी पुरेसे असतात. त्याचप्रमाणे ग्राहकाच्या गरजेप्रमाणेही कुलर बनवून देत असल्याने नागरिकांकडून या कुलर्सला मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.व्यावसायिकांना अडचणीशहरातील विविध भागात अशा प्रकारचे डेझर्ट कुलर विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे दिसून येत आहेत. परंतु, हा कुलर तयार करण्यासाठी लागणारा पत्रा, अँगल, जाळी, पाण्याची मोटार, हवेची मोटार आदी साहित्याच्या किमतींमध्ये १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. तर दुसरीकडे ग्राहक अशा कुलरची मागणी करीत असले तरी वाढीव किंमत देण्यास लवकर तयार होत नसल्याने व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात उद्योग घेण्यात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.आर्थिकदृष्ट्या फायदेशीरउन्हाळ्यात झोपडपट्टी व पत्र्याच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवतो. अशा वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात राहणाºया अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना एअर कंडिशनर बसविणे शक्य होत नाही. तर कडक उन्हाळ्यात नामांकित कंपन्यांचे कुलर व पंखे तग धरू शकत नाही. त्यांची दुरुस्ती देखभालही परवडणारी नसल्याने नागरिकांकडून साध्या डेझर्ट कुलर्सला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.