या संदर्भात नाशिक जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून मागासवर्गीय समाजासाठी विविध योजना राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्ज, बेघरांसाठी घरकुल, शेतकऱ्यांसाठी शेती साहित्य व औजारे, सुशिक्षित बेरोजगारांना महामंडळाच्या माध्यमातून कर्ज योजना, दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजना, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सुधार योजना, आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना संसारोपयोगी साहित्य, मागासवर्गीय समाजावर झालेल्या अन्यायाबाबत ॲट्राॅसिटी कायद्यांतर्गत मदत या सर्व योजना राबविण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असतो, परंतु याबाबतची पाहिजे त्या प्रमाणात अंमलबजावणी होत नाही. याबाबत मुंबईत प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही चर्चा करण्यात आली होती. त्यात अनुसूचित जाती जमाती कल्याण मंडळ समिती विधिमंडळ प्रमुख आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्या सोबत बैठका घेऊन आढावा घ्यावा म्हणजे यातून आपल्या समोर जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती उपलब्ध होऊन समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी मदतच होईल, अशी मागणी करण्यात आली.
समाजकल्याणच्या योजनांपासून मागासवर्गीय वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 4:13 AM