नाशिकरोड- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बिटको महाविद्यालयाने शासकीय शिष्यवृत्ती न आल्यामुळे बीसीए, बीबीए, बायोटेक्नालाजी कोर्सची काही मागीसवर्गीय विद्यार्थ्यांकडून घेतलेली जादा फी परत करण्याचे आश्वासन दिले आहे. नगरसेवक प्रशांत दिवे, समता शिक्षक परिषदचे चंद्रकांत गायकवाड व भगवान पगारे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.नगरसेवक प्रशांत दिवे यांनी सांगितले की, बिटकोमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 2200 रुपये फी आहे. शासनाकडून शिष्यवृत्ती न मिळाल्याने महाविद्यालयाने फी दोन टप्प्यात आकारण्याचे ठरवले होते. पालक व विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासन तसेच समाजकल्याण विभागाकडेही दाद मागितली. मात्र, यश आले नाही. शेवटी त्यांनी नगरसेवक प्रशांत दिवे यांनी पालकांसह बिटको महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनेश कलाल यांची भेट घेतली. त्यांनी संस्थाचालकांशी संपर्क करण्यास सांगितल्यावर दिवे यांनी गोखले एज्युकेशन संस्थेचे संचालक शैलेश गोसावी आणि विभागीय सचिव डॉ. प्राचार्य राम कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. कोरोना काळातील पालकांच्या आर्थिक स्थितीची जाणीव करुन दिली. योग्य कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. प्राचार्य राम कुलकर्णी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पूर्वीप्रमाणेच 2200 रुपये फी आकारण्याचे आश्वासन दिले. दिवे म्हणाले की, शिष्यवृत्ती आली नाही या सबबीखाली महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना वेठीस धरु नये. शिष्यवृत्तीबाबत लोकप्रतिनिधी शासनाकडे पाठपुरावा करतील. बिटकोतील ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जास्त फी घेतली ती परत केली जाणार असून 2200 रुपयेच फी आकारली जाणार असल्याचे आश्वासन गोखले संस्थेचे शैलेश गोसावी, विभागीय सचिव राम कुलकर्णी यांनी दिले आहे.