सटाणा रस्त्यावरून नामपूर ते कुपखेडा हा प्रवास करताना चांद्र प्रवासाची अनुभूती यावी, इतकी या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. नामपूर-साक्री रस्ता टेंबे गावाच्या पुढे खूपच खराब झालेला आहे. खड्ड्यात रस्ते शोधून पादचाऱ्यांना व वाहनचालकांना मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे वाहनांचा खुळखुळा तर शरीराची हाडे खिळखिळी होत असल्याने ग्रामस्थांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नामपूर गावातून साक्रीला जाण्यासाठी व शेतांकडे जाण्यासाठी शनिदेवाचे मंदिराजवळ मोसम नदीवर गेल्यावर्षी छोटा पूल बांधला. दुर्दैवाने नदीला आलेल्या पूरपाण्यात संरक्षक कठडे वाहून गेले. त्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन या पुलावरून प्रवास करावा लागत आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ठेकेदारांचे फावत असून, ह्यमुकी बिचारी कुणीही हाकाह्ण अशी गत सर्वसामन्य जनतेची झालेली आहे.राज्य मार्ग क्र.८ बनला मृत्यूचा सापळा!मालेगाव : नामपूर-साक्री-नंदुरबार हा सुमारे १८२ किमी लांबी असलेला प्रमुख राज्यमार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव, उपविभाग सटाणा अंतर्गत अंबासन फाटा ते काकडगावदरम्यानचा प्रमुख राज्य मार्ग, खालचे टेंभे गावाजवळच्या वाटोळी नदीवरील पुलाजवळील मोठमोठे खड्डे तसेच वरचे टेंभे ते राहुड जिल्हा सरहद्दीपर्यंतचा रस्ता असंख्य खड्ड्यांनी व्यापला असून, या मार्गाने प्रवास करणे एक दिव्यच आहे. नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगावसह आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यांना जोडणारा सर्वात जवळचा प्रमुख राज्य मार्ग म्हणून ह्या रस्त्यावरून रोज हजारो वाहनांची वर्दळ असते. सामान्यपणे मालवाहू ट्रक, शेतमाल, भाजीपाला वाहतुकीचे टेम्पो, ट्रक, ट्रॅक्टर , इंधनाचे टँकर, अवजड वाहतुकीचे ट्रेलर, वाळू वाहतूक करणारे डंपर, आदी वाहनांसह राज्य परिवहन विभागाच्या साक्री, सटाणा, नाशिक, धुळे, दोंडाईचा इ .आगाराच्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस व खासगी वाहतुकीचा राबता मोठ्या प्रमाणावर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मार्च २०१९ मध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलेल्या रस्त्यांच्या बांधकामाचे तीन- तेरा वाजल्याने नामपूर -साक्री रस्ता खड्डेमय झाला असून, त्याची तत्काळ डागडुजी करणे गरजेचे आहे.यावर्षी पर्जन्यवृष्टी अधिक झाल्याने रस्त्यावरून पाणी वाहिले, आजूबाजूच्या शेतामधील पाणी रस्त्यावर आल्याने प्रमुख मार्गांवर खड्डे तसेच मोठ्या चाऱ्या निर्माण झाल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसाळा संपून दोन महिने झाले असले तरी देखभाल व दुरुस्तीची कामे होण्यास विलंब होत आहे. मधल्या काळात चौकशी केली असता काही ठेकेदारांची मागील वर्षाची देयके अजून त्यांना अदा करण्यात आली नसल्याचे कारण पुढे आले आहे, सामान्य नागरिकांकडून मात्र चांगल्या व खड्डेमुक्त रस्त्याची मागणी केली जात आहे.
नामपूर-सटाणा, नामपूर- साक्री व नामपूर-मालेगाव या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. नामपूर -सटाणा-कळवण या रस्त्याच्या काही भागातील काम ग्रामस्थांच्या तक्रारीमुळे प्रलंबित आहे. लोकप्रतिनिधींनी यात तत्काळ मार्ग काढून हा प्रश्न सोडवावा.- गणेश खरोटे, मोसम प्रतिष्ठान, नामपूर