नाशिक : वडाळा गाव परिसरातील गोठ्यांमुळे परिसरात शेणाची दुर्गंधी पसरली आहे. या भागातील गोठ्यांमधून गायी व म्हशींचे मलमूत्र रस्त्यावर येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसत अलून नागरिकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या भागातील नियमबाह्य गोठ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
नागरिकांचा रस्त्यावर मुक्त संचार
नाशिक : शहरात संचार बंदी लागू असतानाही वडाळा गाव परिसरासह वडाळा-पाथर्डी रस्त्यावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असून या भागात संचार बंदीचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे, या भागात नागरिक मुक्त संचार करीत असताना पोलीस प्रशासन आणि मनपा प्रशासनाचे मात्र येथील परिस्थितीकडे दुर्लक्ष होत आहे.
इंदिरानगर-पाथर्डी रस्त्यावर जॉगर्सची गर्दी
नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागू असतानाही इंदिरानगर -पाथर्डी रस्त्यावर पहाटेपासूनच जॉगर्सची गर्दी होत आहे. या भागातील नागरिक व्यायामासाठी घराबाहेर पडत असले तरी गर्दी वाढत असल्याने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे आणि संचारबंदीचेही उल्लंघन होत आहे. पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.
जगन्नाथ चौकात सिग्नल बसविण्याची मागणी
नाशिक - इंदिरानगर - पाथर्डी रस्त्यावरील जगन्नाथ चौकात सिग्नल बसविण्याची मागणी या भागातील नागरिकांकडून होत आहे. समर्थनगर आणि शरयूनगर तसेत इंदिरानगर आणि पाथर्डी कडून येणारी वाहने या चौकात समोरासमोर येऊन अपघात घडण्याचे प्रकार वाढले आहे. त्यामुळे मोठा अपघात होऊन जीवित हानी होण्यापूर्वीच या चौकात सिग्नल उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
रब्बी काढणीवर ढगाळ हवामानाचे संकट
नाशिक : शहरालगतच्या परिसरात रब्बी हंगामातील गहू, हरभरा, बाजरी तसेच कांद्याची काढणी सुरू आहे. मात्र बुधवारी झालेला अवकाळी पाऊस आणि त्यानंतरच्या ढगाळ वातावरणामुळे रब्बीच्या काढणीवर संकट निर्माण झाले आहे. अचानक पाऊस येण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी पीक काढणीच्या कामांना वेग दिला आहे.
ब्युटी पार्लर कर्मचाऱ्यांची मदतीची मागणी
नाशिक : शहरातील ब्युटी पार्लरमधील अनेक कर्मचाऱ्यांवर संचारबंदीमुळे बेरोगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. ब्युटी पार्लर बंद असल्याने हातचे काम गेल्याने अशा कर्मचाऱ्यांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांकडून होत आहे.