गेल्या काही दिवसांपासून ओतूर धरण परिसरातून मातीची अवैधरित्या उत्खनन करून वाहतूक होत असल्याची तक्रार ओतूर ग्रामस्थांनी केली होती. याकडे महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत होता. धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जेसीबीच्या माध्यमातून हे उत्खनन होत असल्याने धरण पात्रात मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. कुठलीही परवानगी न घेता हे उत्खनन होत होते. वीटभट्टी व्यवसायासाठी या मातीचा उपयोग होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले आहे. सध्या ओतूर धरणाच्या कामाने गती घेतली असून धरणपात्रात असलेल्या मातीचा भरावासाठी उपयोग करण्याचे पाटबंधारे विभागाने निश्चित केले असल्यामुळे माती उपसा करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बध घातले आहेत. त्यानुसार अवैध उत्खनन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याची सूचना तहसीलदार कार्यालयाला दिली आहे. याबाबत पाटबंधारे विभागाने ओतूर धरणातून अवैध उत्खनन होत असल्याचे पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत बैठकीत तक्रार केली होती. कळवणचे तहसीलदार बी. ए. कापसे यांना याबाबत दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. दोन दिवसांपूर्वी ओतूर धरणातून माती उत्खनन होत असल्याची माहिती तहसीलदार कार्यालयाला मिळाल्यानंतर यंत्रणेने घटनास्थळी धाव घेऊन बिगर नंबरचे देवीदास मोरे यांचे वाहतूक करणारे वाहन ताब्यात घेऊन सव्वा लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली.
इन्फो
ओतूरच्या कामाला गती
गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ओतूर लघु पाटबंधारे प्रकल्पस्थळावर नव्याने नवीन प्रकल्प बांधण्यासाठी ३९ कोटी २८ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. नवीन प्रकल्प बांधण्यात येणार असल्यामुळे प्रकल्पाचा जुना दगडी सांडवा तोडून नव्याने सांडवा बांधण्यासाठी प्रकल्प क्षेत्रावर विंधन विवरे घेण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. नवीन प्रकल्प पूर्ण लांबीत नव्याने करण्यात येणार असल्यामुळे त्यासाठी सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. प्रकल्पातील अवैशिष्ट कामे, शिल्लक कामे, विशेष दुरुस्ती अंतर्गत अर्थसंकल्पात विशेष दुरुस्तीसाठी ४ कोटी रुपयांची ठोक तरतूद करण्यात आल्यामुळे प्रकल्पाच्या प्राथमिक कामांना गती आली आहे.