नाशिक : जम्मु-काश्मिरच्या भारत-पाक सीमेवर मागील चार दिवसांपासून निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थीतीत लढाऊ हेलिकॉप्टरद्वारे सीमेवर टेहळणी करत असताना हेलिकॉप्टर कोसळून वैमानिक निनाद अनिल मांडवगणे (वय ३३) यांना वीरमरण आले. निनाद हे मुळ नाशिकचे. त्यांचे माता-पिता बॅँकेतून सेवानिवृत्त असून ते पुणे महामार्गावरील रवीशंकर मार्गालगत बॅँक आॅफ इंडिया कॉलनीत वास्तव्यास आहे. निनाद यांचे पार्थीव वायुसेनेच्या विमानातून रात्री दहा वाजेच्या सुमारास ओझर विमानतळावर आणण्यात आले. यावेळी भारतीय सैन्याकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. शुक्रवारी (दि.२८) सकाळी त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
ओझर विमानतळावर शहीद निनाद यांचे पार्थिव दाखल होताच जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी., यांच्यासह वायूदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण केले व सैनिकांनी ‘सॅल्यूट’ केला. त्यांचे पार्थिव रात्रभर ओझर हवाई दलाच्या वातानुकूलित पेटी असलेल्या रुग्णवाहिकेत ठेवण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता ओझरहून शहीद निनाद यांचे पार्थिव त्यांच्या बँक आॅफ इंडिया कॉलनीतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी आणण्यात येणार आहे. त्यानंतर दोन तासांनी शासकीय इतमामात अंत्ययात्रेला सुरूवात होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. डीजीपीनगर क्रमांक-१ला लागून असलेल्या या कॉलनीच्या परिसरात शोककळा पसरली असून गुरूवारी (दि.२८) दिवसभर तसेच रात्री उशीरापर्यंत त्यांच्या निवासस्थानी नागरिकांची गर्दी होती. निवासस्थानापासून ते अमरधाम हे साधारणत: पाच किलोमीटरचे अंतर असल्याने पोलिसांनी या मार्गावरील वाहतुकीचे विशेष नियोजनही केले आहे.जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेले निनाद यांचे पार्थिव रात्री हवाई दलाच्या विशेष विमानाने ओझर विमानतळावर आणण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजता नाशिक अमरधामजवळील गोदावरीच्या काठावर सिंहस्थ कुंभमेळ्यात बांधण्यात आलेल्या नव्या घाटाजवळ मैदानात त्यांच्या पार्थिवावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. निनाद यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन वर्षांची मुलगी असा परिवार आहे.