नाशिक : महापौरपदासाठी शिवसेनेकडून विद्यमान विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीकडून त्यांचा एकच अर्ज दाखल झाला, तर भाजपाने उपमहापौरपदावर समाधान मानत एकूण चार अर्ज दाखल केले. मनसेसह अन्य पक्षांचा उमेदवारीबाबत थेट निर्णय न झाल्याने एकापेक्षा अनेकांनी अर्ज दाखल केले आहेत.महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत मंगळवारी दुपारी दोन वाजेपर्यंत होती. या कालावधीत महापौरपदासाठी शिवसेनेच्या वतीने सुधाकर बडगुजर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. त्यांच्यामुळे त्यांच्या उमेदवारीची औपचारिक घोषणा बाकी आहे. मनसेच्या वतीने शशिकांत जाधव, सुदाम कोंबडे, सलीम शेख आणि अशोक मुर्तडक यांनी, तर राष्ट्रवादीच्या वतीने विक्रांत मते आणि सुनीता निमसे, कॉँग्रेसच्या वतीने उद्धव निमसे यांनी, तर अपक्ष गटातून संजय चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.उपमहापौरपदासाठी भाजपाकडून गटनेता संभाजी मोरूस्कर त्याचबरोबर सिंधुताई खोडके, ज्योती गांगुर्डे, फुलवती बोडके यांनी राष्ट्रवादीच्या वतीने विक्रांत मते, छायाताई ठाकरे, सुफीयान जीन, सुनीता निमसे, कॉँग्रेसच्या वतीने लक्ष्मण जायभावे, राहुल दिवे, विमल पाटील, तर मनसेच्या वतीने अशोक सातभाई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुपारी पक्षाचे नेते, नगरसेवक आणि समर्थकांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आले. (प्रतिनिधी)