नाशिक : महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक गो. बा. पाटील यांना महासभेच्या ठरावानुसार बडतर्फ करण्यात आल्यानंतर त्यासंदर्भातील प्रस्ताव प्राप्त करून घेऊन त्यांच्या घरावर रात्रीच्या वेळी बडतर्फीचे आदेश चिटकविण्यात आले आहेत. पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीच्या पूर्वसंध्येला ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, पाटील यांनी दाखल केलेली याचिका मागे घेतली असून, मनपाच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका ते सोमवारी (दि. ३०) नव्याने दाखल करणार आहेत. मनपाच्या उद्यान विभागाच्या घोटाळ्या प्रकरणी उद्यान अधीक्षक गो. बा. पाटील यांची चौकशी सुरू होती. ती पूर्ण करून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांना बडतर्फीची अंतिम नोटिस बजावली व ती कारवाई कायम करण्यासाठी महासभेत प्रस्ताव सादर केला होता. सदरचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला खरा; परंतु त्याचा ठराव प्रशासनाला उपलब्ध होत नव्हता. दरम्यान, पाटील यांनी संभाव्य कारवाईच्या अनुषंगाने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्याची सुनावणी गेल्या बुधवारी (दि. २५) होणार असल्याने प्रशासनाने धावपळ करीत हा ठराव महापौरांकडून प्राप्त करून घेतला व तत्काळ आदेश करून रात्रीच्या वेळी जाऊन पाटील यांच्या घरावर हा आदेश चिटकविल्याचे सूत्रांनी सांगितले. पाटील यांनी याचिका दाखल करताना ते मनपाच्या सेवेत असल्याच्या संदर्भाने याचिका दाखल केली होती.
रात्री घरी जाऊन घरावर चिटकविले बडतर्फीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:55 AM