नाशिक : कर्नाटक, गोव्यात आमदारांना विकत घेणाऱ्या भाजपला काय झाले तेच कळत नाही, इकडून फोड, तिकडून विकत घे, असा प्रकार करूनही भाजपची भूक कशी भागत नाही. भाजप पक्ष आहे की बकासुर, असा सवाल करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढविला. ज्याप्रमाणे बकासुराचे पोट फुटले तसे भाजपचे होऊ नये, अशी भीतीही त्यांनी बोलून दाखविली.येथे कॉँग्रेसच्या उत्तर महाराष्टÑातील पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत थोरात बोलत होते. ते म्हणाले, पक्ष अडचणीच्या काळात असताना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. निवडणुका तोंडावर आहेत, पक्षाला गत वैभव प्राप्त करून द्यायचे आहे. पक्षाने कठीण काळ पाहिला आहे. १९९९ मध्ये राष्टÑवादी कॉँग्रेसची स्थापना झाली. त्यावेळी कॉँग्रेसमध्ये कोणी उरते की नाही, असा प्रश्न विचारला जात होता. ज्यांनी कॉँग्रेस सोडली, त्यांची जागा नव्याने घेतली व कॉँग्रेसला नवीन पालवी फुटली होती हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. २०१४ च्या निवडणुकीनंतरही कॉँगे्रस संपली असाच प्रचार केला गेला. परंतु त्यानंतर गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या राज्यात कॉँग्रेसने भरारी घेतली हा इतिहास असून, कॉँग्रेस हा शाश्वत असलेला विचार आहे. शाश्वत नेहमीच टिकत असते असे सांगून, सध्या देशात खोटे बोला, पण रेटून बोला अशी परिस्थिती सत्ताधाºयांनी निर्माण केली आहे. त्यातून मिळालेली सत्ता फार काळ टिकणार नाही, असा दावा त्यांनी केला.कारगिल दिनाचा संदर्भ देत थोरात यांनी, ज्या बोफोर्स तोफांनी कारगिल युद्धात विजय मिळवून दिला त्या बोफोर्स स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांनी खरेदी केल्या होत्या. त्यात भ्रष्टाचार झाल्याचा प्रचार आजच्या सत्ताधाºयांनी केला होता याची आठवण करून दिली. त्याच तोफा कारगिल युद्धात कामी आल्या असे सांगून थोरात यांनी, राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला असून, त्यांना पीक विम्याचे पैसे मिळत नाही. जे सत्तेवर आहेत, तेच विमा कंपन्यांवर मोर्चे काढत आहेत, याचा अर्थ त्यांचा कारभार ठीक नाही याची अप्रत्यक्ष कबुलीच देण्यात आली असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना प्रभारी वामसी चांद रेड्डी यांनी कॉँग्रेस पक्षाची जबाबदारी नवीन टीमवर सोपविण्यात आली असून, महाराष्टÑाची निवडणूक देशासाठी महत्त्वाची असल्याने सर्वांनी एकदिलाने या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केली असल्याचे सांगितले, तर माजी आमदार मुजफ्फर हुसेन यांनी, कॉँग्रेसच्या काळात झालेल्या कामांचे श्रेय घेण्याचे काम भाजपाकडून केले जात असून, सत्तेचा दुरुपयोग भाजपाच्या काळातच अधिक झाल्याचे सांगितले.प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांनी केले. यावेळी नाशिक जिल्ह्णाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार निर्मला गावित, विनायकदादा पाटील, प्रताप वाघ, शरद आहेर, शाहू खैरे, हेमलता पाटील, प्रसाद हिरे, राजाराम पानगव्हाणे, वत्सला खैरे, नयना गावित, ज्ञानेश्वर गायकवाड, ज्ञानेश्वर काळे आदी उपस्थित होते.दिवाळीनंतर विस्तारबाळासाहेब थोरात यांनी, विधानसभेच्या निवडणुका आटोपल्यानंतर दिवाळीनंतर पक्ष संघटनेचा विस्तार करणार असल्याचे सांगितले. त्यावेळी प्रत्येकाने निवडणुकीत केलेल्या कामांचे मूल्यमापन केले जाईल, त्याचबरोबर पक्ष संघटनेवर असलेली निष्ठादेखील विचारात घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपा पक्ष आहे की बकासुर : थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 1:19 AM