मातोरी : शहर व परिसरात वणव्याचा कहर सुरूच आहे. ब्रम्हगिरीनंतर चामरलेणी, रामशेज, मायना डोंगरासह मातोरी शिवारात मंगळवारी (दि. २२) सामाजिक वनीकरण विभागाच्या गायरान वनक्षेत्रावर वणवा भडकला. सुळा डोंगराच्या पाठीमागे पिंपळटेकजवळ असलेल्या या वनक्षेत्रात वणवा वाऱ्याच्या वेगामुळे सर्वत्र पसरला. क्षणार्धात आगीने भक्ष्यस्थानी मोठे क्षेत्र पडले. घटनेची माहिती मिळताच विविध पर्यावरणप्रेमी संघटनांचे स्वयंसेवक, गावकरी वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करत वणवा रात्री उशिरापर्यंत शमविला.
नाशिक जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेत नाशिकच्या पश्चिमेस दरी, जुने धागूर परिसरात वनव्याची मालिका सातत्याने सुरू आहे. कुण्या विकृताच्या दुष्ट कृत्याने हा वणवे भडकत असून, वनविभागापुढे अशा वनगुन्हे करणाऱ्यांचा शोध घेण्याचे आव्हान उभे राहिले आहे. मातोरी गावाच्या गायरान वनजमिनीवरील जैवविविधता जळून बेचिराख झाली. हा वणवा विझवण्यात काही प्रमाणात यश येत असले तरी सोसाट्याचा वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगाने वाढणाऱ्या आगीमुळे वणवा थेट दरीच्या दऱ्यादेवी पर्यटनाच्या भागापर्यंत येऊन पोहोचला होता. रात्री उशिरा नऊ वाजेपर्यंत वणव्याची आग धगधगत होती.
शिवकार्य गडकोट संस्था, वृक्षवल्ली फाउंडेशनसह दरी-मातोरीतील जागरूक युवक, ग्रामविकास मंडळांनी धाव घेत हा वणवा विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. कोणी झाडांच्या फांद्यांची झोडपणी करत आग विझवत होता, तर कोणी पेटलेल्या गवतावर बादल्यांनी पाणी फेकून आग विझविण्याचा प्रयत्नात होता. सामाजिक वनीकरणासह वनविभाग प्रादेशिकच्या सातपूर वनपरिमंडळातील कर्मचारीही या निसर्गप्रेमींच्या मदतीला धावून गेले. यामुळे रात्री उशिरा वणवा शमविण्यात यश आले.