नाशिक: इस्लामी संस्कृतीचा दुसरा मोठा सण ईद-उल-अज्हा अर्थात बकरी ईद उद्या शहरासह जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरी केली जाणार आहे. ईदच्या सामुदायिक नमाजपठणाचा सोहळा पारंपरिक पद्धतीने नियोजित जागा शहाजहांनी ईदगाह मैदानावर सकाळी संपन्न होणार असल्याची माहिती शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनी दिली. दोन दिवसांपासून शहरत पावसाच्या संततधारेचा वेग वाढला असला तरी उद्या सकाळी पावसाची उघडीप मिळण्याची आशा असून, नमाजपठण इदगाह मैदानावर केले जाणार असल्याचे खतीब यांनी सांगितले.पावसाच्या संततधारेने ईदगाह मैदानावर जमलेले पाणी जमिनीत मुरले असून, सोमवारी दिवभर संततधार सुरू असली तरी चिखलाचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे नमाजपठण करणे सहज शक्य होणार आहे, असे ईदगाह समितीचे म्हणणे आहे. मुस्लीम बांधवांनी नमाजपठणाच्या सोहळ्यासाठी उद्या इदगाहवर येताना रेनकोट, छत्री तसेच पावसाच्या पाण्यात ओले होणार नाही, अशाप्रकारचे पाणकापड सोबत आणावे, असे आवाहन खतीब यांनी केले आहे. नमाजपठणाचा मुख्य सोहळा नियोजित वेळेच्या काही मिनिटे अगोदर होणार आहे. नेहमीप्रमाणे इदगाहच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर शुचिर्भूत होण्यासाठी पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यात येणार असल्याचे इदगाह समितीच्या वतीने सांगण्यात आले. पावसाची उघडीप मंगळवारी दिवसभरात जेवढी मिळाली त्या वेळेत महापालिका कर्मचाऱ्यांकडून मैदानावर साचलेल्या काही पाण्याच्या डबक्यांमध्ये मुरूम टाकला गेला. रोलरद्वारे मैदानाचे सपाटीकरण करण्यात आले आहे, जेणेकरून मातीचा दाब पक्का राहून चिखलाची समस्या उद्भवणार नाही. एकूणच नमाजपठणाच्या सोहळ्याची जय्यत तयारी इदगाह मैदानावर करण्यात आली आहे. पावसामुळे मैदान आलेचिंब जरी झाले असले तरी चिखलाचे प्रमाण कमी असल्याने नमाजपठणाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. धार्मिकदृष्ट्या बकरी ईदला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रेषित हजरत इब्राहिम व त्यांचे पुत्र हजरत इस्माईल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बकरी ईदपासून पुढे सलग तीन दिवस ‘कुर्बानी’ करण्याची प्रथा आहे. याचदरम्यान हज यात्राही पूर्ण केली जाते.
बकरी ईद : उद्या ‘ईदगाह’वरच होणार नमाजपठणाचा मुख्य सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 3:18 PM
पावसाच्या संततधारेने ईदगाह मैदानावर जमलेले पाणी जमिनीत मुरले असून, सोमवारी दिवभर संततधार सुरू असली तरी चिखलाचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे नमाजपठण करणे सहज शक्य होणार आहे, असे ईदगाह समितीचे म्हणणे आहे.
ठळक मुद्दे रेनकोट, छत्री, पाणकापड सोबत आणावेनमाजपठणाचा मुख्य सोहळा नियोजित वेळेच्या काही मिनिटे अगोदर मैदानावर साचलेल्या काही पाण्याच्या डबक्यांमध्ये मुरूम टाकला गेलामाजपठणाच्या सोहळ्याची इदगाह मैदानावर जय्यत तयारी