लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये गुजरातच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी व त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वृद्धी व्हावी याकरिता सर्वशिक्षा अभियानांतर्गत ‘बाला प्रकल्प’ राबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत शाळांमध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दिली आहे. ‘बिल्डिंग एज लर्निंग एड’ अर्थात बाला प्रकल्पाची मूळ संकल्पना युनिसेफच्या समर्थनार्थ आर्किटेक्चरल रिसर्च अॅण्ड डिझाइन सेंटरच्या व्हीनासने विकसित केलेली आहे. भारतात या प्रकल्पाची अंमलबजावणी गुजरात राज्यातील २५५८ शाळांमध्ये सर्वशिक्षा अभियानांतर्गत करण्यात आली असून, तो यशस्वीही ठरला आहे. गुजरातमध्ये त्यासाठी स्थापत्य अभियंते, शिक्षक व मुख्याध्यापक यांना प्रशिक्षित करून पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. बाला प्रकल्पांतर्गत शाळांच्या भिंती, दरवाजे, खिडक्या, फर्निचर आदी साधनांवर विविध प्रकारची चित्रे, गणितांची सूत्रे, नकाशे, बाराखडी आदी रंगविले जाणार असून, मुलांना खेळताखेळता शिक्षण देण्याचा व स्वयंशिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शाळांच्या इमारतींची रचना व तेथील भौतिक सुविधांचा शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीत मोठा सहभाग असतो. त्यामुळेच भौतिक व पायाभूत सुविधांची निर्मिती करणे व मुलांना शिक्षणाची गोडी लागावी याकरिता उपक्रम राबविले जाणार असल्याचे उपासनी यांनी सांगितले.
मनपा शाळांमध्ये ‘बाला प्रकल्प’
By admin | Published: May 27, 2017 12:53 AM