नाशिक : अवसायनात निघालेल्या श्रीराम सहकारी आणि बालाजी सहकारी बॅँकेत महापालिकेने ठेवलेल्या ११ कोटी ७४ लाखांच्या ठेवी जवळपास बुडीतच निघाल्याने पालिकेच्या सन २०१४-१५ च्या आर्थिक लेखा परीक्षण अहवालात गंभीर ताशेरे ओढण्यात आले असतानाच बालाजी बॅँकेकडून १६ लाख रुपये वसूल करण्यात महापालिकेला यश आले आहे. अंशत: का होईना महापालिकेला बालाजी पावला. आता श्रीराम कधी पावणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.महापालिकेने श्रीराम सहकारी बॅँकेत सन २००१ मध्ये ठेवी व मुदत खात्यात रक्कम गुंतविली होती. त्यात पालिकेतील कर्मचाºयांचा निर्वाह निधी, कर्ज निवारण निधी, घसारा निधी तसेच काही रकमांचा समावेश होता. तसेच बालाजी सहकारी बॅँकेतही सन १९९६-१९९७ या काळात चालू खात्यात ४० लाख रुपये जमा होते. परंतु, सन २००२ मध्ये या दोन्ही बॅँका आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्या आणि नंतर अवसायनात निघाल्या. सन २०१४-१५ पर्यंत श्रीराम बॅँकेकडे व्याजाच्या रकमेसह ८ कोटी ६५ लाख ३५ हजार रुपयांची थकबाकी आहे. तसेच २ कोटी ६५ लाख रुपये मुदत खात्यात जमा आहेत. श्रीराम आणि बालाजी या दोन्ही बॅँका मिळून पालिकेची ११ कोटी ७४ लाख रुपयांची रक्कम अडकून पडलेली आहे. सदर दिवाळखोरीत निघालेल्या दोन्ही बॅँकांकडून व्याजासह ठेवी तसेच चालू खात्यातील रक्कम परत मिळावी यासाठी गेल्या १२-१३ वर्षांपासून महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. सद्यस्थितीत दोन्ही बॅँकांवर प्रशासकाची नियुक्ती आहे परंतु, वसुलीबाबत काहीच कार्यवाही होत नसल्याने त्याचा फटका पालिकेलाही बसला आहे. सदर बुडीत रकमेबद्दल सन २०१४-१५ च्या लेखा परीक्षण अहवालात लेखा परीक्षकांनी गंभीर ताशेरे ओढत तत्कालीन पदाधिकारी व अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्याचा शेरा मारला होता. दरम्यान, बुडीत रकमेबाबत पाठपुरावा करणाºया महापालिकेच्या प्रयत्नांना अंशत: का होईना यश आले असून, बालाजी बॅँकेकडून ४० लाखांपैकी १६ लाख रुपये वसूल करण्यात आले आहे. मात्र, श्रीराम बॅँकेकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने सदर वसुली ही डोकेदुखी ठरली आहे.
बालाजी पावला, श्रीराम कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 12:32 AM