नाशिक- नवी मुंबई विमानतळाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची शिवसेनेची तयारी असली तरी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांंनी शिवसेना प्रमुख आज असते तर त्यांनी स्वत:चे नाव देण्यास नकार देऊन जेआरडी टाटा यांचे नाव देण्याचे सुचवले असते असे मत व्यक्त केले आहे.
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ शुक्रवारी (दि.११) नाशिकमध्ये दाखल झाले असून त्यांनी सकाळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर भाष्य केले. शिवसेना प्रमुख आणि दि. बा. पाटील या देाघांच्या नावालाही आमचा पाठींबाच आहे, असे सांगून ते म्हणाले की, नामकरणाचा वाद एकत्र बसवून सोडवण्याची गरज आहे.
खासदार संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणाविषयी पुकारलेल्या आंदोलनाच्या पाश्व'भूमीवर बोलताना खासदार संभाजी राजे यांनी कोरोनाच्या काळात आंदोलन करावे हे काय सांगणार, ते शाहु, फुले, आंबेडकर यांचे भक्त आहेत, असे ते म्हणाले. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाहीत याची ते पुरेपूर काळजी घेतील असे सांगून भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावरून विचलीत हेाण्याची गरज नाही, हा प्रश्न सर्वेाच्च न्यायालयात सुटणार असल्याचे ते म्हणाले.
वाघ पंजाही मारू शकतो...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर सुरू झालेल्या चर्चेच्या संदर्भात बोलताना भुजबळ यांनी राज्याच्या अनेक प्रश्नांचे उत्तर केंद्राकडे आहे, त्यामुळे जमवून घ्यावे लागते असे सांगतानाच मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असते, वाघ पंजाही मारू शकतो असे सूचक विधान केले.