नाशिक : महापालिकेप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही शिवसेनेच्या ए.बी. फॉर्मचा गोंधळ कायम राहिल्याने शिवसेनेचे एकलहरे गणातील अधिकृत उमेदवार तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के यांना अपक्ष निवडणूक लढविण्याची वेळ आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी उन्मेश महाजन यांनी या गणातून सचिन युवराज जगताप यांना शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले.दरम्यान, एकलहरे व पळसे गटासह या गटातील चारही गणात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने एकनिष्ठ आघाडी स्थापन करून तिकीट नाकारलेले उमेदवार शिवसेनेच्या उमेदवारांसमोर निवडणूक लढणार असल्याने शिवसेनेला तो एक धक्का मानला जात आहे. एकलहरे गटातून खासदारपुत्र अंजिक्य हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिल्याने गटातील तिकिटाचे प्रबळ दावेदार एकलहरे सरपंच शंकर धनवटे नाराज झाले होते. तसेच एकलहरे गणातून ३ फेब्रुवारीलाच सचिन युवराज जगताप यांनी शिवसेनेच्या ए.बी. फॉर्मसह उमेदवारी अर्ज भरला होता. तर तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के यांना अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अगदी शेवटच्या क्षणी ए.बी. फॉर्म देण्यात आला होता. त्यामुळे त्यांना शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून मान्यता मिळालेली नाही. तिकडे पळसे गटातून शिवसेनेकडून उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जाणारे माजी सदस्य संजय तुंगार व पंचायत समिती उपसभापती अनिल ढिकले यांना डावलून उपजिल्हाप्रमुख जगन आगळे यांना उमेदवारी दिल्याने दोन्ही नाराज होते. त्यातच तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के यांचा शिवसेनेचा उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आल्याने नाराजीत भरच पडली. त्यामुळे या सर्व नाराजवीरांनी बुधवारी एका ठिकाणी मेळावा घेऊन बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानत त्यांच्या नावानेच एकनिष्ठ आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, पळसे व एकलहरे गटासह पळसे, सिद्धपिंप्री, एकलहरे व लहवित गणातून या एकनिष्ठ आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)
नाशिकला बाळासाहेब ठाकरे ‘एकनिष्ठ’ आघाडी
By admin | Published: February 09, 2017 12:24 AM