नाशिक:महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) काँग्रेसचा मोठा वाटा आहे. आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे. हे सरकार मजबूत राहिले पाहिजे, हीच आमची प्रमाणिक भूमिका आहे, असे वक्तव्य काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी एका प्रचारसभेला संबोधित करताना केले होते. अशोक चव्हाण यांच्या भूमिकेला काँग्रेस नेते आणि राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पाठिंबा दर्शवला असून, अशोक चव्हाण जे बोलले ते चुकीचे नाही. काँग्रेस आहे म्हणूनच सरकार आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये निधी वाटपात असमानता नाही. विभागानुसार निधी वाटप केला जातो. काँग्रेसला निधी मिळतो. राज्य सरकारमध्ये सर्वांत कमी आमदार असल्यामुळे आम्ही तिसऱ्या स्थानी आहोत. सर्वांमुळे महाविकास आघाडी सरकारचे काम चांगले सुरू आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. ते नाशिकमध्ये बोलत होते.
अशोक चव्हाण चुकीचे बोलले नाही
अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या वाट्याबाबत केलेल्या विधानाबाबत बाळासाहेब थोरात यांना विचारणा करण्यात आली. त्यावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, अशोक चव्हाण चुकीचे बोलले नाही. काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे. तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार आहे आणि त्यामध्ये काँग्रेसचे महत्त्व आहे. पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. देशातही काँग्रेस स्थान आणि वाटा खूप मोठा आहे. काँग्रेसशिवाय युपीए नाही. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी युपीएचे नेतृत्व करत आहेत, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
अटलजींचे मन मोठे होते, दुर्दैवाने तसे दिसत नाही
बांगलादेश मुक्तीच्या कार्यक्रमात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नाव टाळण्यात आले. पण प्रत्येकाच्या मनात इंदिरा गांधींचे नाव होते. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे मन मोठे होते. मात्र, आता दुर्दैवाने तसे दिसत नाही, अशी टीका करत प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढवायचा आहे. त्यामुळे काही ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या जात आहेत, असे थोरात म्हणाले. तसेच भाजपला दूर ठेवण्यासाठीच आम्ही नवी मुंबई एकत्र आलो आहोत, असेही थोरातांनी सांगितले.
दरम्यान, लोकांचा जीव वाचवला पाहिजे, यासाठी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मेहनत घेण्यात आली. या सर्व कामांवर लक्ष एकत्रित करुन राज्याच्या विकासाचा गाडा पुढे चालत राहिला पाहिजे, या अनुषंगाने महाविकास आघाडीने निश्चित प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा आहे. आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे हे मुद्दाम सांगितले पाहिजे. काँग्रेसच्या ताकदीनेच या महाविकास आघाडीचा विचारपूर्वक निर्णय आपण घेतला, असे अशोक चव्हाण म्हणाले होते.