नाशिक : बलिप्रतिपदानिमित्त दिवाळीच्या दिवशी अत्याचारविरोधी कृती समितीच्या वतीने बळीराजा गौरव रॅली काढण्यात आली होती. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या रॅलीत महाराष्ट्र किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अखिल भारतीय किसान सभा, नाशिक मनपा श्रमिक सभा, नाशिक जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती सेल, एआयएसएफ, आम आदमी पार्टी, नाथपंथीय संस्था, नागवंशीय संस्था, भारतीय बौद्ध महासभा आदींसह अनेक सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या.आम्ही सारे नागवंशीय संस्थेच्या शाहिरी पथकाने गौरव रॅलीत विविध प्रबोधनपर गीतांचा जागर करीत बळीराजाचा गुणगौरव करत चैतन्य निर्माण केले. बळीराजा गौरव रॅलीची परंपरा याही वर्षी टिकून ठेवत, ईडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो! अशी आर्त हाक देत, बळीराजा गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अत्याचारविरोधी कृती समितीचे मुख्य निमंत्रक राहुल तुपलोंढे यांनी उद्देश स्पष्ट केला. यावेळी राजू देसले, सुनील मालुसरे, हंसराज वडघुले पाटील, ज्ञानेश्वर काळे, सागर निकम, अविनाश आहेर, विजय पाटील, महेश पगारे, संविधान गायकवाड, मनोज चोपडे, संजय मोकळ, धर्मराज शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी क्रांतिज्योती पारखे, नारायण घाटकर व विकी गायधनी यांना विद्रोही रत्न २0१८ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी दिलीप लिंगायत (बळीराजा वेशभूषा), योगेश बर्वे (शेतकरी वेशभूषा) या जीवंत देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधले होता. बळीराजा गौरवपर घोषणा व विविध क्रांतिकारी गीते रॅलीत सादर करण्यात आली. या रॅलीला इदगाह मैदानापासून सुरुवात झाली. जिल्हा रुग्णालय मार्गे त्र्यंबक नाका सिग्नल, जिल्हा परिषद कार्यालय, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळा, खडकाळी सिग्नल मार्गे रॅली शालिमार चौकात आली. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीचा समारोप करण्यात आला.