मालेगाव : सफाई कामगारांच्या वारसांना मनपा सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी भारतीय मेहतर बाल्मिकी समाजाच्या पदाधिकारी व सफाई कामगारांनी येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर धरणे आंदोलन छेडले होते. आंदोलनकर्त्यांनी सामुदायिक विष प्राशन करण्याचा निर्धार केल्यामुळे मनपा प्रशासनाची धावपळ उडाली होती. मनपा उपायुक्त कमरूद्दीन शेख यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत येत्या २० आॅक्टोबरपर्यंत वारस हक्काची यादी प्रसिद्ध करू, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. शासनाने पाच वर्षांची अट असलेल्या सफाई कामगारांना वारस हक्काद्वारे मनपा सेवेत सामावून घ्यावे, असा निर्णय दिला आहे; मात्र मनपा प्रशासनाकडून सफाई कामगारांच्या वारसांना सेवेत घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. वारंवार लेखी निवेदन देऊनही मनपा प्रशासन दखल घेत नाही. यामुळे समाजाचे महानगरप्रमुख धीरसिंग ढिलोर यांच्या नेतृत्वाखाली येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. दुपारी मनपा उपायुक्त शेख यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत २० तारखेपर्यंत यादी प्रसिद्ध करू, असे आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात प्रल्हाद बारसे, अनिल चंडालिया, राजेंद्र छजलाने, सुशिल ढिलोर, आनंद बागूल, अनिल छजलाने, अजय दामू, उषा गोयर, कविता देवकर, रत्ना शेजवळ, आरती ढिलोर, निशा टांक, मीना तेजी आदींसह सफाई कामगार सहभागी झाले होते.
बाल्मीकी समाजातर्फे मोसम पुलावर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:26 AM