कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थी, पहिलवान बाळू शिवाजी जुंदरे याने नेत्रदीपक कामगिरी करीत कुस्ती स्पर्धेत यश संपादन केले आहे. दि. ५ मे रोजी नोएडा (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्याने तृतीय क्रमांक मिळवला आहे.बाळू जुंदरे याने शाळेचे व भरवीर खुर्द गावाचे नाव कुस्ती या खेळातून भारतभर पोहोचविले असून, देशभरातील नामवंत पहिलवानांना चितपट करीत आस्मान दाखविणाऱ्या बाळूने या राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळविले आहे.या गुणवत्तापूर्ण कामगिरीच्या जोरावर देशपातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या खेलो इंडिया या स्पर्धेसाठी पहिलवान बाळूची निवड झाली आहे.त्याला साकूरफाटा येथील गुरुहनुमान आखाड्याचे ज्ञानेश्वर शिंदे, माजी सरपंच दत्तू पाटील जुंदरे, भारत सर्व सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र नलगे, प्रकाश जाधव, कवडदरा विद्यालयाचे प्राचार्य आर. एन. चौहाण यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.