नाशिकरोड : बिटको ते नांदूर नाकादरम्यान अवजड वाहनांच्या वाहतुकीला दिवसा बंदी घालण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. अजय देवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देवीकर यांना नगरसेवक प्रशांत दिवे, मंगला आढाव यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जेलरोडवर १०-१२ छोट्या-मोठ्या शाळा, महाविद्यालय, खासगी क्लासेस असल्याने या ठिकाणी सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत दिवसभर विद्यार्थ्यांची मोठी रेलचेल असते. शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेलाच भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालय भरत-सुटत असल्याने त्याच वेळेला कामगारांचीदेखील मोठी वर्दळ असते.विद्यार्थी व कामगारांची गर्दी लक्षात घेऊन अपघात टाळण्यासाठी बिटको ते नांदूर नाकादरम्यान दिवसा अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी घालावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर शिवा ताकाटे, बबलू चंदनानी, कुलदीप आढाव, गणेश गडाख, उमेश शिंदे, पंकज गाडगीळ, गणेश ताजनपुरे, भिकचंद पोरजे, प्रशिक आहिरे, अक्षय आहिरे, पंकज कर्पे, रोशन आढाव, रामजी पांडे आदींच्या सह्या आहेत. वाहतुकीची कोंडी जेलरोड मार्गावरून नाशिक-औरंगाबाद, मुंबई-आग्रा, नाशिक-पुणे या महामार्गांना सहजरीत्या जाता येत असल्याने बाहेरगावच्या छोट्या वाहनांचीदेखील दिवसभर वर्दळ असते. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, वाहतुकीची कोंडीदेखील सतत होत असते.
बिटको-नांदूर नाका मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:49 AM