नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी राजकीय पक्ष, संघटनांनी लावलेले फलक, बॅनर्स काढले जात असताना शासकीय कार्यालयांमध्येदेखील शासनाच्या योजनांच्या जाहीरात फलक लावण्यात आलेले आहेत, आयोगाने आता शासकीय व निमशाासकीय कार्यालयाच्या आवारात राजकीय वा शासकीय फलकबाजी करण्यावर निर्बंध लादले असून, तसे आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी काढले आहेत.निवडणूक आयोगाने १० मार्चपासून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपावेतो आदर्श आचारसंहिता लागू केलेली आहे. सदर निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच मतदारांवर थेट प्रभाव पडणार नाही अशा स्वरूपाचे कृत्य होवू नये म्हणून नाशिक जिल्ह्णातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, शासकीय व निमशासकीय विश्रामगृहे यांच्या आवारात निवडणूक प्रचारास प्रतिबंध करण्यात आला आहे.याशिवाय शासकीय कार्यालयाच्या आवारात केंद्र वा राज्य सरकारच्या योजनांची माहिती व मंत्र्यांचे छायाचित्र असलेले बॅनर्सदेखील काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राष्टÑीय उपक्रम असेल तर त्याची फक्त जनहितासाठी माहिती देता येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवार, दि. १९ मार्च ते ४ मे २०१९ पावेतो जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, सर्व शासकीय व निमशासकीय विश्रामगृहांच्या आवारात कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाºया उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी व हितचिंतकांनी सभा घेणे, रॅली काढणे, निवडणुकी संदर्भात पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, निवडणूक विषयक घोषवाक्य लिहिणे किंवा सदरील आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे किंवा मतदारांना प्रलोभन दाखविणे आणि निवडणुकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करणे किंवा राजकीय कामासाठी सदर आवाराचा वापर करणे इत्यादी बाबीवर निर्बंध घालण्यात आले आहे.
शासकीय कार्यालयांच्या आवारात पोस्टर्सवर बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 1:44 AM