कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बाजार समितीत लिलावाच्या वेळीदेखील व्यापारीवर्गात सुरक्षित अंतर पाळणे, तोंडाला मास्क बांधणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच लिलाव आटोपल्यावर तत्काळ शेतमालाची रवानगी करणे किंवा माल भरणे काम लवकर आटोपून याबाबत सूचना दिल्या जात आहेत. मात्र असे असले तरी, गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत नेहमीच माल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांबरोबरच व्यापारी, भरेकरी व किरकोळ खरेदीदारांची गर्दी होत असून, त्यामुळे कोरोना वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे शासनाने लागू केलेल्या संचारबंदी, जमावबंदी आदेशानंतर भाजीपाला जीवनावश्यक वस्तूंमध्ये गणण्यात आल्यानंतर त्याच्या खरेदीसाठीच अधिक गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे काेरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात आल्यावर बाजार समिती व पंचवटी पोलिसांनी संयुक्तपणे गर्दी नियंत्रणासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यात प्रामुख्याने बाजार समितीत शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत भाजीपाला खरेदी करण्यासाठी येणाऱ्या किरकोळ ग्राहकांना बाजार समितीत येण्यास मनाई करण्यात आली असून, बाजार समिती आवारात विनाकारण गर्दी करू नये, तोंडाला मास्क बांधावा तसेच कामाशिवाय कोणी बाजार समितीत येऊ नये, अशा सूचना बाजार समितीच्या वाहनातून ध्वनिक्षेपकावरून दिल्या जात आहेत.
आगामी काळात नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यास बाजार समिती संबंधित व्यापारी भाजीपाला कंपनी तसेच नागरिकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची तयारी करणार असल्याचे बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांनी सांगितले.
गुरुवारी रात्री बाजार समितीतील आवारात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चहा दुकान व दोघा व्हेजिटेबल कंपनीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दंडात्मक कारवाई केली.