नाशिक : वाहनतळाची जागा नियमानुसार सोडणे आवश्यक असतानादेखील ती बळावून त्याचा दुरुपयोग करण्यात आल्याची शहरात शेकडो प्रकरणे आहेत. आता मनपाने अशा वाहनतळाच्या जागा बळकावणाऱ्यांचा शोध घेऊन मनपा दणका देणार आहे. त्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.शहरातील वाहनतळांचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. महापालिकेकडून व्यापारी संकुले किंवा मिश्र वापराच्या इमारती असो अथवा निवासी मिळकती, नियमानुसार वाहनतळासाठी जागा सोडणे बंधनकारक आहे. नगररचना विभागाकडून त्यानुसार तपासणी करूनच इमारतींना पूर्णत्वाचा दाखला दिला जातो, असे सांगितले जाते. तथापि, शहरात व्यापारी संकुलांमध्ये वाहनतळाच्या जागा बळकविण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असून, त्यामुळे वाहने थेट रस्त्यावर उभी राहतात. एकीकडे शहरात वाहनांची संख्या वाढत आहे आणि दुसरीकडे मात्र वाहनतळांच्या जागा गायब झाल्या आहेत. काही इमारतीतील वाहनतळाच्या जागेत दुकाने सुरू करण्यात आली असून तळघरातदेखील वाहनतळाच्या जागी दुकाने हॉटेल्स काढून गैरवापर सुरू आहे. महापालिकेच्या कायद्यानुसार अशाप्रकारचा वापर अनुज्ञेय नसतानादेखील वाहनतळाच्या जागा बळकवल्याने वाहने मात्र रस्त्यावर उभी करावी लागतात. त्यामुळे होणाºया वाहतूक कोंडीचा सर्वांनाच त्रास होतो. महापालिका एकीकडे रस्त्यावर स्मार्ट पार्किंग सुरू करत असताना दुसरीकडे मात्र अशाप्रकारच्या व्यापारी संकुलात वाहनतळाच्या जागा बळकवल्याचे पुढे आले आहे. यासंदर्भात आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले की, महापालिकेत सध्या अतिरिक्त आयुक्तांची दोन पदे रिक्त असून, ती भरल्यानंतर लवकरच याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. अतिरिक्त आयुक्त नियुक्त झाल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून त्यामार्फत तपासणी करण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले.वर्षानुवर्षे केवळ चर्चाचशहरातील वाहनतळ बळकावलेल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची घोषणा आजची नाही. यापूर्वीदेखील वेळोवेळी अशाप्रकारच्या घोषणा झाल्या आहेत, मात्र कारवाई होत नाही. त्यामुळे आताही कितपत कार्यवाही होईल, याशिवाय शंका व्यक्त केली जात आहे.
पार्किंगची जागा बळकवणाऱ्यांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:31 AM