जिल्हा बँकेचे थकबाकीदार असलेल्या मातोरी गावातील सुमारे १२० शेतकऱ्यांचे बँक ऑफ महाराष्ट्रमधील खाते गोठविण्यात आले असून, त्यामुळे या शेतकऱ्यांचे सर्व व्यवहार बंद झाले आहेत. कोरोनामुळे शेतकऱ्यांना पिकविलेला शेतमाल लॉकडाऊनमुळे आहे त्या स्थितीत शेतात सोडून द्यावा लागला. त्यानंतर जोरदार पावसाने झोडपले. यातून सावरलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा उभारी घेत, शेतीपिकातून मिळालेली थोडीफार बचत बँकेत केली होती. मात्र, आता जिल्हा बँकेने कर्जदार शेतकऱ्यांकडील वसुली सुरू केल्याने त्याचाच भाग म्हणून कर्जदार शेतकऱ्यांची अन्य बँकांतील खाती गोठविण्यात आली आहेत. त्यात मातोरी गावातील जिल्हा बँकेचे कर्जदार असलेले परंतु बँक ऑफ महाराष्ट्रचे खातेदार असलेल्या १२० शेतकऱ्यांच्या खात्यांचा समावेश आहे. बँकेचे खातेच गोठविण्यात आल्याने या शेतकऱ्यांना दैनंदिन व्यवहार करणे मुश्कील झाले असून, आता जगावे तरी कसे असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत.
दरम्यान, याबाबत बँकेशी संपर्क साधला असता त्यांनी सोसायटीकडून थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांची यादी देण्यात आल्याने त्यानुसार कारवाई केल्याचे सांगण्यात आले. ज्यांचे खाते गोठविले त्यांना बँकेच्या बचत, अल्प व दीर्घ मुदत असलेल्या ठेवींचा देखील वापर करता येणार नसल्याचे महाराष्ट्र बँकेच्या व्यवस्थापक वैशाली देशमुख यांनी सागितले.
चौकट====
शेतकऱ्यांना हा जाणूनबुजून त्रास दिला जात असून, सन्मान निधीची मिळणारी पेन्शनदेखील दिली जात नाही. शेतकरी मोठ्या संकटात असताना त्याला मदतीचा हात देण्याऐवजी पूर्ण संपविण्याचा हा डाव आहे.
-बबन धोंडगे, शेतकरी