नाशिक : हंगामी सेवकांना कायम करावे, पार्ट टाईम सबस्टाफला पूर्णवेळ सेवेत सामावून घ्यावे, क्लार्क पदाची भरती करावी, प्रशासकीय बदल्यांचे परिपत्रक मागे घ्यावे, बॅँक शाखा व एटीएम सेंटरची सुरक्षा वाढवावी, आदी मागण्यांसाठी बॅँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि. २७) संप पुकारला आहे. त्यामुळे बॅँकेचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे.
ऑल इंडिया बॅँक एम्प्लाईज फेडरेशन, बॅँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी महासंघ, बॅँक ऑफ महाराष्ट्र
कर्मचारी सेना व महाबॅँक नवनिर्माण सेना संपात सहभागी होणार आहे. एकदिवसीय संपानंतर सकारात्मक निर्णय न झाल्यास २१ व २२ ऑक्टोबरला लाक्षणिक संप पुकारण्यात येईल, असा इशारा या संघटनांनी दिला आहे. संपात सहभागी व्हावे, असे आवाहन शिरीष धनक, धनंजय कुलकर्णी, रवींद्र जोशी, अनंत सावंत, मनमोहन राजापाटील, आदित्य तुपे, अशोक डोकफोडे, राजन भालेराव, सुगंधा सूर्यवंशी, संतोष बागले आदींनी केले आहे.