नाशिक : नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत ५६ उमेदवारी अर्ज बाद केल्याच्या निषेधार्थ संबंधित उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक गौतम बलसाणे यांच्या अंगावर नोटा उधळत त्यांचा निषेध नोंदविला. निवडणूक अधिकाऱ्यांनी पैसे घेत अर्ज अवैध केल्याचा आरेाप करीत बलसाणे यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजीदेखील करण्यात आली.
नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू असून गुरुवारी (दि.१) उमेदवारी अर्ज माघारीचा दिवस होता. तत्पूर्वी, एक दिवस अगोदरच पोटनियम दुरुस्तीबाबत न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या निर्णयानुसार निवडणूक निर्णय अधिकारी बलसाणे यांनी ५६ उमदेवारी अर्ज अवैध ठरविले. या निर्णयामुळे विरोधी परिवर्तन पॅनलमध्ये तीव्र नाराजी असून माघारीच्या दिवशी बलसाणे यांच्या दालनात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. पॅनलचे नेते अशोक सातभाई, हेमंत गायकवाड आणि पॅनलच्या इतर नेत्यांनी उमेदवारी अर्ज बाद करण्यामागे आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करीत बलसाणे यांच्या अंगावर नोटांची उधळण करीत निषेध नोंदविला.
न्यायालयाच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून बलसाणे यांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज बाद केल्यामुळे निवडणूक लढण्याच्या हक्कापासून वंचित ठेवल्याचा आरेाप यावेळी विरोधकांकडून करण्यात आला. निर्णय देताना मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात येऊन चुकीच्या पद्धतीने अर्ज बाद ठरविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी बलसाणे यांच्या दालनात तीव्र घोषणाबाजी करीत निषेध म्हणून त्यांच्या अंगावर नोटा उधळण्यात आल्या.