संजय वाघ नाशिक : संपूर्ण कुटुंबाने जिवाचे रान करून पोटच्या पोरासारख्या जगविलेल्या बागेत निर्यातीसाठी योग्य ठरेल, अशी उच्चप्रतीची द्राक्षे तयार झालेली होती. त्याची निर्यात करून कर्जफेडीसह हातात आगामी वर्षासाठी खेळते भांडवल राहील असे स्वप्न पाहत असताना परतीचा पाऊस काळ बनून आला आणि सर्व होत्याचे नव्हते करून गेला. आता सरकारने अधिक अंत न पाहता एकरी एक लाख रुपये भरपाई दिल्यास पुढच्या वर्षाची तयारी तरी करता येईल, अशी आपबिती बागलाण तालुक्यामधील पिंगळवाडे शिवारातील द्राक्ष उत्पादक शेतकरी रवींद्र भामरे कथन करीत होते.पिंगळवाडे शिवारात भामरे यांची पावणेचार एकर द्राक्षांची बाग आज मरणासन्न अवस्थेत उभी आहे. बागेतून कुजका वास येत होता. एकरी दोन ते सव्वादोन लाख रुपये खर्च याप्रमाणे साधारणपणे आठ लाख खर्च करून भामरे यांनी बाग जगविली होती. ऐन दिवाळीत आलेल्या परतीच्या पावसाने दिवाळे काढले आणि बागेसाठी पाहिलेले स्वप्न अंधकारमय झाले. वडिलांनी घेतलेले कर्ज माथ्यावर थकीत असताना जिल्हा बॅँकेकडून घेतलेले साडेचार लाख तसेच खासगी सावकारांकडून घेतलेले दोन ते तीन लाख रुपयांचे कर्ज आता कोणाच्या भरवशावर फेडायचे, असा भामरे यांनी केलेला उद्विग्न सवाल अस्वस्थ करून गेला.
दिवाळीत दिवाळे निघाले, आता कर्ज कसे फेडायचे? द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 1:48 AM