नाशिक : दिवाळीत बँकांना सलग चार दिवस सुट्टी असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. बँकांना शुक्रवारी (दि.२५) धनत्रयोदशी, शनिवारी (दि.२६) चौथा आठवडा, रविवारी (दि.२७) साप्ताहिक आणि सोमवारी (दि.२८) दिवाळी पाडवा असल्याने बँका बंद राहणार असून, ग्राहकांची चांगलीच गैरसोय होण्याची शक्यता असल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या खरेदी-विक्रीसाठी ग्राहकांची मदार एटीएम आणि आॅनलाइन व्यवहारांवर राहणार आहे.दिवाळीच्या कालावधीत महिन्याअखेर असल्याने नागरिकांना बँकांच्या खात्यावरून व्यवहार करणे अपरिहार्य होणार असताना बँकांना दिवाळी सण आणि चौथा शनिवार यामुळे सलग चार दिवस सुटी मिळणार आहे. त्यामुळे या कालावधीत तब्बल चार दिवस बॅँका बंद राहणार असल्याने ग्राहकांसोबतच अनेक व्यापाऱ्यांचीही गैरसोय होणार असल्याने पुढचे दोन दिवस बँकांचे व्यवहार करण्यासाठी मंगळवारपासून ग्राहकांची गर्दी होऊ शकते. जवळपास सर्वच बँकांनी आॅनलाइन व्यवहारांची सेवा उपलब्ध करून दिली असून, शहरातील ठिकठिकाणचे एटीएमचा ग्राहकांना आधार मिळणार आहे; परंतु अजूनही मोठा वर्ग एटीएम, मोबाइल अॅप आणि आॅनलाइन व्यवहार करीत नाही. अनेक जण रोखीतच व्यवहार करण्यास पसंती देतात. अशा ग्राहकांना मात्र रोख रकमेची चणचण भासण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्याचा बाजारपेठेवरही थेट परिणाम होण्याची शक्यता अर्थशास्त्र तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.एटीएममध्ये रोकड अपुरी पडणार रोकड मिळणे कठीण. दिवाळीच्या काळात असलेल्या चार दिवसांच्या सुट्ट्यांमुळे बाजारात रोकड टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर अनेकजण घरातील देवी-देवतांसह रोख रकमेचीही पूजा करतात. त्यासाठी अगोदरच बँकेतून रोकड काढली जाते. शिवाय गेल्या काही दिवसांपासून एटीएममधून एका दिवसात केवळ २० हजार रुपयेच काढता येत असल्याने बँक खात्यातून रोख रक्कम काढून घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बँकांसोबतच एटीएममध्येही रोकड अपुरी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दिवाळीत बँकांना सलग चार दिवस सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 11:25 PM