सातपूर : भारतीय अर्थव्यस्थेला बळकटी मिळण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी अर्थमंत्रालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय बँकांनी दोन दिवसीय विचार मंथनाला सुरु वात केली आहे. पहिल्या दिवशी सरकारी योजनांना गती देण्यासोबतच डिजिटल व्यवहारांमधील वृद्धी, कृषी कर्ज व कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणे यासह विविध विषयांवर मंथन करण्यात येणार आहे.सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने विभागस्तरीय दोन दिवसीय विचार मंथन बैठकीचा शुभारंभ सातपूर येथील हॉटेल बीएलव्हीडी येथे करण्यात आला. या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून सेंट्रल बँकेचे महाप्रबंधक के. सत्यनारायण (झोनल आॅफिस, पुणे), नाशिकचे विभागीय प्रबंधक डी. एस. शालिग्राम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या बैठकीत नाशिकसह धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील १६१ शाखा प्रबंधक सहभागी झाले आहेत. शाखा स्तरावरून आणि शाखा प्रबंधकांकडून आलेल्या मुद्द्यांवर चर्चा करून त्यासंदर्भात सूचना मागविणे आणि योग्य त्या सूचनांची अंमलबजावणी करणे, तसेच सरकारी योजनांना गती देण्यासोबतच डिजिटल व्यवहारांमधील वृद्धी, मुद्रा योजना, कृषी कर्ज व कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणे अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत शाखा प्रबंधकांचे विविध गट करण्यात आले होते. त्यानंतर विविध विषयांवर गटनिहाय चर्चा झाली. त्यावरील काही उपाययोजनाही शाखा प्रबंधकांनी मांडल्या. ही सर्व माहिती संकलित करून बँकेच्या वरिष्ठ कार्यालयाकडे आणि सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय प्रबंधक डी. एस. शालिग्राम यांनी पत्रकार परिषदेत दिली.जिल्ह्यातील शाखा व्यवस्थापकांची कार्यशाळाभारतीय स्टेट बँकेच्या सातपूर येथील क्षेत्रीय कार्यालयात दोन दिवसीय कार्यशाळेला क्षेत्रीय महाव्यवस्थापक शहर श्रीकृष्ण रंजन, क्षेत्रीय महाव्यवस्थापक ग्रामीण विनोद कुमार, उपमहाव्यवस्थापक सुनील भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. या कार्यशाळेत जिल्ह्यातील स्टेट बँकेच्या ८१ शाखांचे व्यवस्थापक उपस्थित होते. या सर्व व्यवस्थापकांनी सरकारी योजनांना गती देण्यासोबतच डिजिटल व्यवहारांमधील वृद्धी, कृषी कर्ज व कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणे यासह विविध १६ योजनांची माहिती,कारणमिमांसा, उपाययोजना यांची सविस्तर माहिती गटागटाने प्रेझेंटेशनद्वारे सादर केली. दुसऱ्या दिवशी सविस्तर अहवाल तयार करून झोन स्तरावरील विचार मंथनसाठी पाठविण्यात येणार आहे. अशीही माहिती स्टेट बँकेचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक शहर श्रीकृष्ण रंजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बँकांच्या विचार मंथन बैठकीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 1:44 AM