नाशिक : आर्थिक वर्षाच्या अखेरीस लागोपाठ दोन दिवस शासकीय सुट्या आल्याने ३१ मार्च रोजी बॅँकांच्या काम काजावर अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता लक्षात घेता स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालयातील शाखा रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी दिले आहेत. शासनाने आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी वित्तीय वर्षाच्या अखेरच्या दिवशी नेहमीच बॅँकांना पुरेसा वेळ मिळत नाही त्यामुळेच हा निर्णय घेतला असून, भारतीय स्टेट बॅँकेची कोशागार शाखा, देवळाली कॅम्प शाखा, नाशिकरोड, सुरगाणा तालुक्यातील देना बॅँक शाखा यांसह जिल्ह्यातील तालुका मुख्यालयांच्या ठिकाणी असलेल्या स्टेट बॅँकेच्या शाखा व शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या अन्य बॅँका, शाखा रात्री १२ वाजेपर्यंत चालू ठेवता येतील. जिल्हा कोशागार व तालुका उपकोशागार कार्यालयाकडून वितरित होणारी देयके, धनादेश, ड्रॉप्ट्स स्टेट बॅँकेत वटवून रक्कम काढणे तसेच महसुली उत्पन्नाच्या रकमा शासनाकडे भरणा करणे यासाठी पुरेसा अवधी मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
३१ मार्चला बँका रात्री १२ पर्यंत चालणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:52 AM