नाशिक : खासगीकरण हा बँकिंग क्षेत्रातील अडचणींवर उपाय निश्चितच नाही. सहकारी बँकांचा मूळ उद्देश नफा कमावणे नाही. त्यामुळे सहकारी बँकांचे खासगीकरण झाले तर ते सहकाराच्या मूळ उद्दिष्टालाच हरताळ फासणारे असून, खासगीकरणाने सहकारी बँकांचे प्रश्न सुटणार नाही, त्यासाठी बँकिंग कायद्यात बदल करून नवीन सहकारी बँकिंग धोरण अस्तित्वात आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थ तज्ज्ञ तथा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मध्यवर्ती समितीचे नवनिर्वाचित संचालक सतीश मराठे यांनी केले आहे. शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात उत्तर महाराष्ट्र प्रांताच्या सहकार भारतीतर्फे रिझर्व्ह बँकेच्या मध्यवर्ती समितीवर संचालकपदी निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर सतीश मराठे यांचा सोमवारी (दि.२७) स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर यांच्यासह नाशिक महिला बँकेच्या अध्यक्षा शशिकला अहिरे, राष्ट्रीय बँक प्रकोष्टचे प्रमुख संजय बिर्ला, सहकार भारतीचे प्रदेश सचिव विनायक खटावकर आदी उपस्थित होते. सतीश मराठे म्हणाले, १९६९ मध्ये बँकांच्या खासगीकरणाचा प्रयत्न यशस्वी झालेला नसल्याचा पूर्व इतिहास आहे. त्यामुळे बँकांच्या खासगीकरणापेक्षा सहकारी बँकांसह अर्बन कॉ-आॅपरेटीव्ह बँका, पतसंस्था आणि क्रेडिट सोसायट्यांना नियंत्रित करण्यासाठी ५० वर्षांपूर्वीच्या कायद्यात दुरुस्ती आवश्यक आहे. त्यामुळे सहकारी बँकांसह सध्या अडचणीत असलेल्या भारतीय बँकिंग व्यवस्थेच्या वृद्धी आणि विकासाठी नवीन बँकिंग धोरण अस्तित्वात आणण्याची गरज असल्याचे मत मराठे यांनी व्यक्त केले. दरम्यान, विविध सहकारी बँका व पतसंस्थांच्या प्रतिनिधींनीही मराठे यांचा सत्कार केला. प्रास्ताविक अजय ब्रम्हेचा यांनी केले. सूत्रसंचालन शरद जाधव यांनी केले.
खासगीकरणाने बँकांचे प्रश्न सुटणार नाही : सतीश मराठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 1:12 AM