नाशिक : जिल्ह्यात नाशिक व मालेगाव महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव वाढत असताना त्याचे लोण ग्रामीण भागात पोहोचू नये यासाठी घ्यावयाची काळजी व करावयाच्या उपाययोजनांची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यावर सोपविण्यात आली आहे.नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या शंभरीच्या आसपास पोहोचली आहे. जिल्ह्यात सर्वात प्रथम निफाड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्ण सापडला, पाठोपाठ नाशिक व त्यानंतर मालेगाव शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून आले. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाची धावपळ उडालेली असताना सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाबाधित रुग्ण सापडला. एकंदर परिस्थिती पाहता, ग्रामीण भाग अद्यापही कोरोनापासून सुरक्षित असला तरी, शहरी भागात कोरोनाची संख्या पाहता त्याचे लोण ग्रामीण भागात पोहोचू नये याची काळजी आरोग्य विभागाला वाटू लागली आहे.विशेष म्हणजे मालेगाव शहराला लागूनच ग्रामीण भाग असून, कोरोनाचा शिरकाव या भागात होऊ नये यासाठी त्रिस्तरीय संरक्षक रचना लागू करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने नगरपालिका क्षेत्र, महापालिका क्षेत्र व जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा समावेश आहे. त्या त्या क्षेत्राच्या प्रमुखांवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असली असून, जिल्ह्यातील ग्रामीण भाग कोरोनापासून संरक्षित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना घटना व्यवस्थापक म्हणून नेमण्यात आले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपलब्ध असलेल्या आरोग्य साधनसामग्रीचा प्रभावी विनियोग करणे, संभाव्य संकट टाळण्यासाठी पूर्वतयारी करून ठेवणे, मनुष्यबळाची उपलब्धता, औषधांची खरेदी आदी बाबींची पूर्तता करण्याची जबाबदारी बनसोड यांच्यावर सोपविण्यात आली आहे. बनसोड यांच्या अखत्यारितील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने यापूर्वीच ग्रामीण भागात जनजागृती, घरोघरी रुग्णांची तपासणी, संशयित रुग्णांवर उपचार, स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यात कोरोना रोखण्याची जबाबदारी बनसोड यांच्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 11:06 PM
जिल्ह्यात नाशिक व मालेगाव महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव वाढत असताना त्याचे लोण ग्रामीण भागात पोहोचू नये यासाठी घ्यावयाची काळजी व करावयाच्या उपाययोजनांची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
ठळक मुद्देपर्यायी योजना : ग्रामीण भागात फैलाव रोखण्याचा प्रयास