नाशिक : येत्या सोमवारी सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन होत असून, शनिवारपासूनच बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. शनिवार हा औद्यागिक सुटीचा वार असल्याने तसेच रविवारी घरगुती कामांचा व्याप लक्षात घेऊन अनेक नागरिकांनी शनिवारीच गणेशमूर्तींच्या स्टॉल्सवर प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती. बहुतांश नागरिकांनी आकर्षक आणि सुबक गणेशमूर्तींची नोंदणी करून घेतल्या असून, यंदा शाडूमातीच्या मूर्तींच्या मागणीत गतवर्षापेक्षाही वाढ झाली आहे.यंदाचा गणेशोत्सव महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात येत असल्याने बाजारपेठेत त्याचा उत्साहदेखील दिसून येत आहे. नागरिकांचा उत्साह शनिवारपासूनच मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. बाजारपेठेत गणेशमूर्तीची आगाऊ नोंदणी करण्यासाठी सहकुटुंब आलेल्या नागरिकांचे प्रमाणदेखील मोठे होते. बालकांचा उत्साह तर ओसंडून वाहत होता.केवळ शाडूमातीच्या मूर्तीची विक्री करणारे महानगराच्या विविध स्टॉल्स दिवसभर अक्षरश: तुडुंब भरलेले होते. शाडूमातीच्या गणेशमूर्तींच्या किमतीत यंदा सुमारे वीस टक्के वाढल्याने ग्राहक वेगवेगळ्या स्टॉल्समध्ये जाऊन चौकशी करून मूर्तींची खरेदी करीत होते.रविवारी होणाऱ्या हरतालिकेसाठी शनिवारी रविवार कारंजा आणि परिसरातील अन्य बाजारपेठांमध्ये फुलपत्रीदेखील मोठ्या प्रमाणात दाखल झाली होती. महिला वर्गाकडून फूलपत्री घेण्यासाठीदेखील गर्दी झाली होती. आज रविवारच्या दिवशीदेखील फुलपत्रीची मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता असल्याने आदिवासी पाड्यांवरून विक्रीसाठी येणाऱ्यांची संख्यादेखील सायंकाळपर्यंत वाढली होती.शनिवारी गणरायासाठी सजवलेला पाट, चौरंग आणि मखर खरेदीदेखील जोरात होती. अत्यंत आकर्षक पद्धतीने सजविलेले चौरंग बाजारात सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. तसेच यंदा इको फ्रेण्डली मखरदेखील मोठ्या प्रमाणात बाजारात आले असल्याने त्यांच्याकडेदेखील नागरिकांचा बºयापैकी कल होता.
बाप्पाच्या आगमनाची लगबग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 1:07 AM