मनमाड : शहरात मोकाट जनावरांचा उच्छाद वाढल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. रविवारी सैराट झालेल्या एका वळूने दोन जणांना धडक मारून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. शहराच्या कुठल्या ना कुठल्या भागात वारंवार जनावरांच्या झुंजी सुरू असल्याचे चित्र नित्याचे झाले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या प्रकारामुळे अनेक नागरिकांना दुखापत झाली आहे. भरवस्तीत तासन्तास चालणाºया मोकाट जनावरांच्या झुंजीमुळे नागरिकांना अक्षरश: जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते आहे.रविवारी इंडियन आॅइल कंपनीचे व्यवस्थापक महेंद्र यादव हे श्रावस्तीनगर भागात सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडले असता मागून आलेल्या मस्तवाल मोकाट वळूने त्यांना जोरदार धडक देऊन खाली पाडले. खाली पडलेल्या यादव यांना शिंगाने जखमी करण्याचा प्रयत्न केला. वळूच्या तावडीतून त्यांनी कशीबशी आपली सुटका करून घेतली. यानंतर अवघ्या तासाभरात याच भागात राहणाºया रस्त्याने पायी जात असलेल्या भाग्यश्री हिरे या महिलेला वळूने धडक देऊन जखमी केले. हिरे यांच्या डोक्याला मोठी जखम झाल्याने त्यांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहराच्या मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांचे अड्डे तयार झाले असून, मधूनच सुरू होणाºया झुंजींमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शहरातून जाणाºया पुणे-इंदूर महामार्गावर रेल्वे ओव्हर ब्रीजवर वळूंची झुंज जुंपली. यामुळे काही काळ रहदारीला अडथळा निर्माण झाला होता. यानंतर थोड्याच वेळात या वळूंनी रस्त्याचा कब्जा घेतला. रस्त्याच्या मधोमध सुरू असलेली ही झुंज सोडवण्यासाठी या पुलावरून ये-जा करणाºया नागरिकांनी प्रयत्न केला; मात्र बेधुंद वळूंवर कुठलाही परिणाम होत नव्हता. वळूंच्या या झुंजीमुळे अन्य जनावरांची व नागरिकांची एकच पळापळ सुरू झाली. यात मोकाट जनावरांनी जवळून जात असलेल्या एका दुचाकीला धडक दिल्याने त्यात दुचाकी घसरून अपघात झाला. यात दुचाकीवरील अनिता कुलकर्णी (रा. भालूर) या महिलेला गंभीर दुखापत होऊन हात फ्रॅक्चर झाला. शहरातून जाणाºया महामार्गांवर मोकाट जनावरांचे वास्तव्य असल्याने नेहमीच रहदारीला अडथळा होत असतो. पादचाºयांनासुद्धा या उपद्रवाचा सामना करावा लागत आहे. शहरातील मोकाट जनावरांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मनमाड शहरात वळू ‘सैराट’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:20 AM