देवळाली कॅम्प : शिंगवे बहुला आंबडवाडी येथील बार्न स्कूल मार्ग लष्कराच्या विभागाकडून बंद करण्यात येणार असल्याच्या जोरदार हालचाली सुरू असून यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होणार आहे. तसेच ग्रामस्थांवर अन्याय होणार असल्याचा आरोप सर्व राजकीय पक्षांकडून होत आहे.यासंदर्भात खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वपक्षीय महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छावणी परिषदेचे उपाध्यक्ष बाबुराव मोजाड, शिवसेनेचे साहेबराव चौधरी, दत्ता सुजगुरे, राजाभाऊ चौधरी, प्रमोद मोजाड, प्रवीण पाळदे, बाळासाहेब बेरड, गुंडाप्पा देवकर, चंद्रकांत गोडसे, मनसेचे खंडेराव मेढे, भास्कर चौधरी, आरपीआयचे रवींद्र गायकवाड, अशोक गायकवाड, सचिव भालेराव, चेतन जाधव, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे विजय गायकवाड, स्वप्नील गवळी आदिंसह पदाधिकारी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. १९७५ पूर्वीच तेव्हाचे लष्कराचे मुख्य अधिकारी वाय. के. कपूर यांनी चेंडू फळी मैदान हे गावातील खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिले होते. हे मैदानही आता लष्कराकडून जेसीबीच्या साह्याने खोदून बंद करण्यात आले आहे. अनेक ग्रामस्थांच्या जमिनी या लष्करी हद्दीत गेल्या आहेत. गावातील बहुतांश घरातील एक तरी जवान हा लष्करी सेवेत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून ग्रामस्थांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.लष्कराकडून सुरक्षेच्या कारणास्तव अनेक मार्ग पूर्वीच बंद केलेले आहेत. संरक्षणमंत्री देवळालीत आले असता रस्त्यांबाबत सभेत तक्रार केली असता त्यांनीही सुरक्षा प्रथम, असे सांगितले होते. यामुळे नागरी भागातून लष्करी हद्दीतून असलेले मार्ग पूर्णत: बंद राहण्याबाबतचे काम पूर्णत्वास येत आहे. एकीकडे लष्करी हद्दीतून पुन्हा नागरी भागाकडे येणारे रस्ते बंद होत असले तरी लष्करालगत अनेक बांधकाम व्यावसायिकांना नाहरकत दाखले देत असल्याने सुरक्षेचा दुजाभाव सर्वांसमोर येत आहे. (वार्ताहर)
बार्न स्कूल मार्ग बंद करण्याचा प्रयत्न
By admin | Published: August 22, 2016 12:12 AM