देवळाली कॅम्प : भगूर साउथ रस्त्यावरील बार्न्स स्कूलमध्ये निलंबित कर्मचाऱ्याने शाळेजवळच आत्महत्त्या केल्याने गुरुवारी दुसऱ्या दिवशी शाळा भरू शकली नाही. शाळेच्या परिसरात तणावाची परिस्थिती असून शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक सर्वजण भयभीत झाले आहेत.बार्न्स स्कूलमध्ये ९४ कंत्राटी व कायम कामगार हे पगारवाढीच्या प्रश्नावरून मार्च महिन्यापासून संपावर आहेत. महाराष्ट्र शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सेना व शाळा प्रशासन यांच्यामध्ये या विषयावरून अनेकवेळा चर्चा झाली. कामगार न्यायालयातदेखील उपायुक्तांनी मध्यस्थी केली होती. जून महिन्यात संपावर गेलेल्या कंत्राटी व कायम कामगारांनी आपला संप व मागण्या मागे घेत आहे, आहे त्या पगारावर काम करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र शाळा प्रशासनाने संस्थाचालकांचा निर्णय आल्यावर कळवू, असे सांगितले होते. आठ दिवसांपूर्वी शाळा प्रशासनाने २९ कंत्राटी कायम कामगारांना सेवेतून मुक्त करण्यात आल्याचे पत्र देण्यात आले होते. कंत्राटी कायम कामगार व शाळा प्रशासनातील वाद समेट होण्याऐवजी चिघळला होता. संपावर गेलेल्या कामगारांच्या जागेवर ठेकेदारामार्फत शाळा प्रशासनाने नवीन काही कामगारांना कामावर रुजू करून घेतले, तर त्या ठेकेदाराने कामावरून कमी केलेल्या २९ कामगारांना तुम्हाला रोजंदारीवर पुन्हा शाळेत काम करायचे असेल तर माझ्यामार्फत रुजू होऊ शकतात, असे पत्र दिले होते.मंद्री याने नैराश्येपोटी बुधवारी पहाटे ६ वाजेच्या पूर्वी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळील झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्त्या केली. या घटनेमुळे कर्मचारी व त्यांच्या नातेवाइकांमध्ये शाळा प्रशासन व प्राचार्य ज्युलियन लुक यांच्याविरुद्ध प्रचंड संताप व रोष व्यक्त करण्यात आला. दुसऱ्या दिवशी गुरुवारी शाळा भरू शकली नाही. तणावाची परिस्थिती असल्याने शाळेबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर दिवसभर कर्मचारी व त्यांचे नातेवाईक प्रवेशद्वाराजवळ बसून होते. शाळेमध्ये शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी कोणीही गेले नाही. तर शाळेच्या आवारातील वसतिगृहात २५० विद्यार्थी वास्तव्यास असून, तेदेखील दिवसभर बाहेर आले नव्हते. तणावाच्या परिस्थितीमुळे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक सर्वजण भयभीत झाले असल्याचे चित्र दिसत आहे. (वार्ताहर)
बार्न्स स्कूल दुसऱ्या दिवशीही बंदच
By admin | Published: September 23, 2016 1:13 AM