टिळकवाडीतील खोदकाम थांबेना
नाशिक : गॅस पाईपलाईनसाठी शहरात सुरू असलेले रस्ते खोदकाम त्वरित पूर्ण करून खड्डे बुजवावेत, असे आदेश मनपा आयुक्तांनी दिलेले असतानाही टिळकवाडीतील खोदकाम पुन्हा सुरू झाले आहे. या मार्गावरी खोदकाम बुजवून डांबरीकरण करण्यात आले होते. आता पुन्हा काही ठिकाणी खोदकाम सुरू झाले आहे.
बॅरिकेट्सच्या आधाराने वाहनांचे पार्किंग
नाशिक : मेनरोडवरील गर्दी कमी करण्यासाठी मेनरोडकडे जाणारे मार्ग पोलिसांनी बॅरिकेट्स लावून बंद केले आहेत. वाहनधारकांनी या बॅरिेकेट्सचा आधार घेऊन आपली वाहने उभी केली आहेत. त्यामुळे अशा परिसराला वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अंतर्गत रस्त्यांवरही अनेकांनी वाहने उभी केल्याने कोंडीत भर पडली आहे.
उपनगर चौकातील सिग्नल धोकादायक
नाशिक : उपनगर चौकातील सिग्नलचे पालन होत नसल्याने अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. द्वारकाकडून नाशिकरोडकडे जाणारे रिक्षाचालक उपनगरकडे जाणाऱ्या रस्त्याला वळसा घालून नाशिकरोडकडे जात असल्याने सिग्नल असूनही अनेकदा अपघात घडत असतात. अशा रिक्षाचालकांवर कारवाईची मागणी होत आहे.
डिझेल दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका
नाशिक : डिझेल दरवाढ झाल्यामुळे मालवाहतुकीचेही दर वाढले आहेत. त्यामुळे दुकानदारांनी देखील मालाचे दर वाढविले असल्याने त्याचा अप्रत्यक्ष फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. महागाईने त्रस्त नागरिकांना आता डिझेल दरवाढीमुळे देखील महागाईला सामोरे जावे लागत आहे.
शेतकऱ्यांना अवजारे, बियाणांचे वाटप
नाशिक: कृषी संजीवनी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अवजारे आणि बियाणांचे वाटप केले जात असून या योजनेला तालुकापातळीवर सुरुवात केली आहे. अनेक तालुक्यांमध्ये आमदारांच्या माध्यमातून साहित्याचे वाटप केेले जात असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. येत्या काही दिवसात अनेक तालुक्यांमध्ये अशाप्रकारचे कार्यक्रम होणार आहेत.