--
बेशिस्त दुचाकीस्वार पुन्हा जोरात
नाशिक : जिल्ह्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन सोमवारी संपुष्टात येताच रस्त्यावर सुसाट वेगाने धावणाऱ्या बेशिस्त दुचाकीस्वारांची बेफिकिरी दिसून आली. शहरातील वडाळा, पाथर्डजी रोड, रविशंकर मार्ग, कॉलेज रोड, मुंबई नाका, द्वारका तसेच नाशिकरोड भागात अनेक दुचाकीस्वार रस्त्यावर स्टंटबाजी करीत धिंगाणा घालताना दिसून येत आहे. अशा बेशिस्त दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
--
आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा
नाशिक : शहरातील रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. मागील काही महिन्यांपासून रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला होता. यामुळे अनेकांना साप्ताहिक सुटी किंवा रजा घेणेही कठीण झाले होते. मात्र, आता रुग्णसंख्या कमी होत असताना नवीन रुग्णांचे प्रमाणही कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.
--
शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी
नाशिक : चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील अनेक आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीस आलेला केशर, हापूस आंबा वादळामुळे गळून पडल्याने त्याचे नुकसान झाले आहे. विशेषत: आदिवासी भागात त्याचे प्रमाण अधिक असल्याने या शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
--
किरकोळ भाजीविक्रेत्यांसमोर समस्या
नाशिक : शहरातील कडक निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली असून, शहरातील किरकोळ भाजीविक्रेत्यांनाही मुबलक माल उपलब्ध होत आहे. मात्र, विक्रेत्यांना मनपाने ठरवून दिलेल्या जागेतच भाजीविक्री करावी लागत आहे. मात्र, अशा नवीन ठिकाणी नियमित ग्राहक येत नाही, त्यामुळे अपेक्षित व्यावसाय होत नसल्याने भाजी विक्रेत्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
--
शहरात अवैध मद्यविक्री जोरात
नाशिक : लॉकडाऊनमुळे मद्यविक्रीची दुकाने बंद असल्याने अवैध मद्यविक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक भागांत सर्रास अवैध मद्यविक्री केली जाते. पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. अवैध मद्यविक्रीला पोलिसांनी आळा घालावा, अशी मागणी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणे पोलिसांना माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
--
हॉटेलचालकांसमोर विविध अडचणी
नाशिक : मागील वर्षापासून अडचणीत सापडलेल्या हॉटेल उद्योगाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही व्यावसायिकांनी तर हॉटेल बंद करणे पसंत केले आहे. हॉटेलचे मेन्टेनन्स आणि स्टाफ सांभाळणे अनेकांना कठीण झाले आहे. लॉकडाऊन उघडल्यानंतरही ग्राहक येतात की नाही, याबाबतही साशंकता व्यक्त केली जात असल्याने सध्या तरी पर्यायी व्यवसाय करण्याचा विचार अनेक जण करीत आहेत.
--