जळगाव नेऊर : विवाह समारंभ म्हटला की वधू-वरांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण. या क्षणाच्या प्रतीक्षेत वधू,वरासह दोन्ही बाजूंकडील मंडळी असतात. मात्र, यंदा कोरोनाच्या विघ्नामुळे रेशीमगाठी जुळण्यास नव्या मुहूर्ताची वाट पहावी लागणार आहे.लग्न सोहळा म्हटला की मोठ्या प्रमाणात खर्च होतो. काहीजण आपल्या आयुष्यातील पुंजी त्यासाठी खर्च करतात, तर काहीजण शेती विकतात. काहीजण कर्ज काढून विवाहसोहळा पार पडतात. यावर्षी अनेक ठिकाणी विवाह जमले, मुहूर्तही ठरला; पण कोरोनाने मुहूर्ताला हरताळ फासला. नवीन पर्वाची वाट पाहत होते व नवीनच आयुष्यात पदार्पण करणार होते त्यांना मात्र कोरोनाने अटकाव घातला आहे. दिवाळी झाल्यानंतर लग्न समारंभ सुरू होऊन वधू आणि वर शोधून कुंडली व लग्नाची जुळवाजुळव केली जाते. मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत सर्वात जास्त विवाह मुहूर्त असतात. मात्र या काळातच कोरोनाने अंतरपाट धरल्याने विवाह सोहळ्यांनाच लॉकडाउन करावे लागले आहे. ठरलेल्या मुहूर्ताप्रमाणे लग्नपत्रिका़, वाजंत्री, हॉल, आचारी, कपडे, दागिने यासाठी आगोदरच बुकिंग केली जाते. अनेकांनी ती केलीही. मात्र, कोरोनाने अनेकांच्या लग्न सोहळ्यावर विघ्न आणल्याने नव्या जीवनात पदार्पणासाठी विवाहेच्छुकांना नव्या मुहूर्ताची प्रतीक्षा करावी लागणार आहे. लॉकडाउनमुळे खऱ्या अर्थाने ठरविले तर विवाहसमारंभात होणारा अनावश्यक खर्च वाचू शकतो व नवीन पायंडा पडून कमी लोकांमध्येही विवाह करता येऊ शकेल. यातून होणारे रुसवे-फुगवे, रु ढी-परंपरांना फाटा देऊन एक चांगला पायंडा पडू शकतो, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
विवाहाच्या मुहूर्ताला ‘कोरोना’ची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 11:17 PM
विवाह समारंभ म्हटला की वधू-वरांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण. या क्षणाच्या प्रतीक्षेत वधू, वरासह दोन्ही बाजूंकडील मंडळी असतात. मात्र, यंदा कोरोनाच्या विघ्नामुळे रेशीमगाठी जुळण्यास नव्या मुहूर्ताची वाट पहावी लागणार आहे.
ठळक मुद्देअनेकांचा हिरमोड : लग्नपत्रिका, वाजंत्री, हॉल, आचारी, कपडे, दागिने यासाठीचे बुकिंग रद्द